Join us  

Maharashtra Election 2019: सर्व मतमोजणी केंद्रांवर कडेकोट सुरक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 12:48 AM

Maharashtra Election 2019: ५०० कर्मचाऱ्यांची फौज, २०० कर्मचारी मते मोजणार

मुंबई - २४४ उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ मतदारसंघांकरिता २६ ठिकाणी मतमोजणी केंद्रे उभारण्यात आली असून या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विविध सुरक्षा दलांच्या सशस्त्र तुकड्यादेखील मतमोजणी केंद्रालगत तैनात करण्यात आल्या आहेत.

प्रत्येक मतदारसंघातील मतमोजणी केंद्रामध्ये सकाळी ६.३० पासून सुमारे ५०० कर्मचारी अव्याहतपणे कार्यरत असणार आहेत. यापैकी २०० कर्मचारी हे मतमोजणी कार्यवाही करणार असून उर्वरित कर्मचारी हे सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात असणार आहेत. मतमोजणी प्रक्रिया सकाळी ७ वाजता सुरू होणार असून, प्रत्यक्ष मतमोजणीस सकाळी ८ वाजता सुरुवात होईल.

मतमोजणीसाठी सकाळी ६ वाजता सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी मतमोजणी केंद्रात हजर असतील. प्रत्यक्ष मतमोजणीची प्राथमिक तयारी पूर्ण झाल्यानंतर व प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वी म्हणजेच सकाळी ७:५५ वाजता सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना कर्तव्यनिष्ठेची शपथ दिली जाईल. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सकाळी ८ वाजता सुरुवात होईल. सुुरुवातीला टपाल मतदानाची मोजणी केली जाते. पोस्टल बॅलेटची मतमोजणी पूर्ण झाल्यावरच मतदान यंत्रांची मोजणी सुरू केली जाते.

मतदानयंत्रांची विशिष्ट कळ दाबल्यावर त्यातील मतांची आकडेवारी समजते. मतमोजणीसाठी प्रत्येक मतमोजणी केंद्रामध्ये १४ टेबल्स ठेवली आहेत. प्रत्येक टेबलसाठी एक मतमोजणी पर्यवेक्षक व एक मतमोजणी सहायक नेमण्यात येतात. तसेच केंद्र शासनाचे कर्मचारी हे सूक्ष्म निरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. उमेदवारांची संख्या आणि मतदारांची संख्या याआधारे मतमोजणी फेऱ्यांची संख्या निर्धारित करण्यात आली आहे.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019मतदान