माहीम कोळीवाड्याला मिळणार नवी झळाळी, पालिकेकडून विहारक्षेत्र आणि संरक्षक भिंतीचे सुशोभीकरण

By सीमा महांगडे | Published: March 12, 2024 07:56 PM2024-03-12T19:56:48+5:302024-03-12T19:57:35+5:30

Mumbai News: पालिकेकडून मुंबईतील विविध विभागांमध्ये सुशोभीकरण प्रकल्प हाती घेण्यात आले असून  याचाच एक भाग म्हणून माहीम कोळीवाडा येथील समुद्र किनाऱयालगत असलेले विहार क्षेत्र व सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उभारण्यात आलेल्या संरक्षक भिंतीचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.

Mahim Koliwada will get a new fountain, promenade and beautification of the protective wall from the municipality | माहीम कोळीवाड्याला मिळणार नवी झळाळी, पालिकेकडून विहारक्षेत्र आणि संरक्षक भिंतीचे सुशोभीकरण

माहीम कोळीवाड्याला मिळणार नवी झळाळी, पालिकेकडून विहारक्षेत्र आणि संरक्षक भिंतीचे सुशोभीकरण

- सीमा महांगडे
मुंबई - पालिकेकडून मुंबईतील विविध विभागांमध्ये सुशोभीकरण प्रकल्प हाती घेण्यात आले असून  याचाच एक भाग म्हणून माहीम कोळीवाडा येथील समुद्र किनाऱयालगत असलेले विहार क्षेत्र व सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उभारण्यात आलेल्या संरक्षक भिंतीचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. परिणामी माहीम किल्ला परिसर आणि सी फूड प्लाझा येथे येणाऱया नागरिकांना तसेच पर्यटकांना सुखद अनुभव येईल असा विश्वास पालिका व्यक्त करीत आहे.

माहीम कोळीवाडा येथील समुद्रकिनाऱ्याला पर्यटकांची खास पसंती असते. या समुद्र किनाऱ्याच्या बाजूलाच कोळीवाडा देखील आहे. दरम्यान किनाऱ्या लागत असणाऱ्या विहार क्षेत्र व संरक्षक भिंतीचे सुशोभीकरण करण्यासाठी वास्तू सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. या वास्तू सल्लागाराच्या आराखड्यानुसार विहार क्षेत्र व संरक्षक भिंतीचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. पावसाळ्यात किंवा अन्य वेळीही समुद्राच्या उसळणाऱया लाटांपासून सागरी किनाऱयाचे संरक्षण होण्यासाठी याठिकाणी संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे. १३० मीटर लांबी आणि सुमारे अडीच फूट उंच असणाऱया या संरक्षक भिंतीला तिन्ही बाजूंनी सुशोभीकरण करण्यात येणार आहे.

विहार क्षेत्राला लागून फूड प्लाझा बनविण्यात आला आहे. या ठिकाणीदेखील सुशोभीकरण करण्यात येणार आहे. जवळपास १३० मीटर लांबी आणि सरासरी १० मीटर रूंदी असलेल्या प्रशस्त अशा या विहार क्षेत्रावरून पर्यटकांना कोळीवाड्यातील महिला बचत गटांनी बनवलेल्या पदार्थांचा आस्वाद घेत विस्तीर्ण अशा समुद्रकिनाऱयाची भ्रमंती करता येणार आहे. पावसाळ्यात कोळीबांधवांना समुद्रात जाता येत नाही, अशावेळी त्यांच्या बोटी या विहार क्षेत्रावर ठेवता येतील.

दरम्यान, नजीकच्या काळात याठिकाणी अधिकाधिक सुविधा देतानाच विहित परवानगी प्राप्त करून कायमस्वरूपी प्रसाधनगृह आणि पाणी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त अजितकुमार आंबी यांनी दिली आहे.      
 
माहीम किल्ल्याची दुरूस्ती आणि जीर्णोद्धार
कोळीवाडा येथील समुद्र किनाऱयालगत असलेल्या माहीम किल्ल्याची देखील दुरूस्ती आणि जीर्णोद्धाराचे काम करण्यात येणार आहे. किल्ल्याच्या पायऱयांवरील माती, भिंतीवरील जुने टाईल्स व प्लास्टर काढण्यात येणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर सुशोभीकरण कामाचा आराखडा तयार करून किल्ल्याची दुरूस्ती आणि जीर्णोद्धार सुरू करण्यात येणार आहे.

Web Title: Mahim Koliwada will get a new fountain, promenade and beautification of the protective wall from the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई