मुंबईत आता महिलाराज!
By Admin | Updated: November 24, 2015 02:06 IST2015-11-24T02:06:57+5:302015-11-24T02:06:57+5:30
महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा; किंबहुना एक पाऊल पुढे जाऊन काम करण्याचे हे युग आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्यावर आता ‘महिलाराज’ दिसून येणार आहे

मुंबईत आता महिलाराज!
मुंबई : महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा; किंबहुना एक पाऊल पुढे जाऊन काम करण्याचे हे युग आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्यावर आता ‘महिलाराज’ दिसून येणार आहे. नुकतीच सार्वजनिक बांधकाम खात्याने मुंबईतील तीन महत्त्वाच्या कार्यकारी अभियंतेपदी तीन महिलांची नियुक्ती करून नवा इतिहास रचला आहे.
मुंबई प्रेसिडेन्सी विभाग म्हणजे मंत्रालय, फोर्ट आणि परिसर या विभागाच्या कार्यकारी अभियंतापदी प्रज्ञा वाळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वरळीच्या कार्यकारी अभियंतापदी स्वप्ना कोळी यांची नियुक्ती करण्यात आली. वरळी अंतर्गत मलबार हिल ते वरळी हा भाग येतो. तर अंधेरीच्या कार्यकारी अभियंतापदी अनिता परदेसी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अंधेरीच्या अंतर्गत वांद्रे ते बोरीवली हा भाग येतो. त्यामुळे आता राज्यातील या महत्त्वाच्या खात्याची धुरा महिलांच्या खांद्यावर असून त्या ही जबाबदारी नि:शंकपणे सार्थ ठरवतील, असा विश्वास खात्यातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
कार्यकारी अभियंता हे महत्त्वाचे पद असून अशा पदावर नेहमी पुरुष अधिकाऱ्यांची वर्णी लागते. परंतु या वेळी पहिल्यांदाच महिलाराज येते आहे. महिला अभियंत्यांच्या या निवडीबद्दल महिला अधिकाऱ्यांनीही आनंद व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)