सर्वच क्षेत्रात महिलाराज
By Admin | Updated: March 8, 2015 00:40 IST2015-03-08T00:40:39+5:302015-03-08T00:40:39+5:30
सुनियोजित शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईमध्ये आता खऱ्या अर्थाने महिलाराज येणार आहे. पालिकेमध्ये १११ पैकी ५६ जागा महिलांसाठी राखीव आहेत.

सर्वच क्षेत्रात महिलाराज
नवी मुंबई : सुनियोजित शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईमध्ये आता खऱ्या अर्थाने महिलाराज येणार आहे. पालिकेमध्ये १११ पैकी ५६ जागा महिलांसाठी राखीव आहेत. महापौरपदही महिलांसाठीच असून या व्यतिरिक्त प्रशासनासह, सामाजिक, क्रीडा क्षेत्रांमध्येही महिलांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये यावर्षी पहिल्यांदाच ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. निवडणुकीनंतर सभागृहात ५५ पुरुष तर ५६ महिला सदस्य असणार आहेत. महापौरपदही महिलांसाठीच असणार आहे. विद्यमान पालिकेमध्येही अनेक महिलांनी कामकाजामध्ये कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. मंदा म्हात्रे यांनी बेलापूर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांना पराभूत करून राज्याच्या राजकारणामध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सद्यस्थितीमध्येफक्त राजकीयच नाही तर सर्वच क्षेत्रांमध्ये महिलाराज सुरू आहे. विविध क्षेत्रांमध्ये महिलांनी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नेमबाज सीमा शिरूर यांचेही पनवेलमध्ये वास्तव्य आहे. कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रे, जलतरणपटू ज्योत्स्ना पानसरे, अॅथलेटिक नीलम राजपूत, सुप्रिया पाटील यांनी क्रीडाक्षेत्रात नवी मुंबईला नावलौकिक मिळवून दिला आहे.
सामाजिक क्षेत्रामध्ये अन्नपूर्णा महिला मंडळाच्या प्रेमा पुरव, मेधा पुरव-सामंत, वृषाली मगदुम, प्रीती पाटकर, शोभा मूर्ती यांनी राज्य व देशपातळीवर नावलौकिक मिळविला आहे. महिलांना रोजगार मिळवून देण्यापासून कचरावेचक महिला, वंचित मुलांचे शिक्षण व इतर विविध क्षेत्रांमध्ये चांगले सामाजिक काम उभे झाले आहे. प्रशासनामध्येहीमहिलांनी चांगले काम केले आहे. महापालिकेच्या सेवेत असणाऱ्या वर्षा भगत यांनी ईटीसी अपंग शिक्षण व प्रशिक्षण केंद्राला राष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करून दिली आहे. सिडकोमध्ये व्ही. राधा यांनी विमानतळापासून अनेक प्रश्न सोडविण्यासाठी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. सिडकोमधील भ्रष्टाचार थांबविण्यासाठी मुख्य दक्षता अधिकारी प्रज्ञा सरवदे यांनी केलेल्या कामाचे सर्वस्तरातून कौतुक होऊ लागले आहे.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वृषाली मगदुम यांनी महिला दिनानिमित्त प्रतिक्रिया देताना सांगितले की, तळागातील महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. झोपडपट्टी व इतर ठिकाणी महिलांसाठी आवश्यक त्या सुविधा मिळत नाहीत. अद्याप मोफत प्रसाधनगृह उपलब्ध नाहीत. अनेक महिलांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. अशा महिलांसाठी उपाययोजना केल्यास खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण झाले असे म्हणता येईल.
सामाजिक
प्रेमाताई पुरव, अन्नपूर्णा महिला मंडळ, मेधाताई पुरव-सामंत, अन्नपूर्णा महिला
मंडळ, प्रीती पाटकर, प्रेरणा सामाजिक संस्था, वृषाली मगदुम, स्त्री मुक्ती संघटना व अन्वय व्यसनमुक्ती केंद्र,
शोभा मूर्ती, आरंभ सामाजिक संस्था, डेजी गांगुर्डे, अलर्ट इंडिया, सामाजिक संस्था, सुप्रभा रावराणे, वंचित मुलांचे शिक्षण
प्रशासन : व्ही. राधा, सहव्यवस्थापकीय संचालिका, सिडको, प्रज्ञा सरवदे, मुख्य दक्षता अधिकारी, सिडको, रिमा दीक्षित, मुख्य सामाजिक सेवा अधिकारी, सिडको, वर्षा भगत, संचालिका, ईटीसी अपंग शिक्षण प्रशिक्षण केंद्र, महापालिका, संगीता शिंदे -अल्फांसो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,नेरूळ, मीरा बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सीबीडी, माया मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एपीएमसी
शिक्षण, आरोग्य, बँकिंग क्षेत्रात महिलांचे योगदान चांगले असून शहरात खऱ्या अर्थाने महिलाराज सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. नवी मुंबईमध्ये पुरुषांच्या तुलनेमध्ये महिलांचा जननदर ९३४ एवढा आहे. यासाठी महापालिकेचा राज्य शासनाने गौरविले आहे.
क्रीडा : सीमा शिरूर, नेमबाज,
अभिलाषा म्हात्रे, कबड्डी, ज्योत्स्ना पानसरे, जलतरणपटू, रोजालीन लिव्हीस, धावपटू, नीलम राजपूत, मॅरेथॉनपटू, सुप्रिया पाटील, मॅरेथॉनपटू, त्रिषा मुखर्जी, नेमबाज.