महायुती, आघाडी तुटल्याने सहाही मतदारसंघांत बहुरंगी लढती
By Admin | Updated: September 27, 2014 00:15 IST2014-09-27T00:15:42+5:302014-09-27T00:15:42+5:30
महायुती व आघाडी संपुष्टात आल्याने वसई व नालासोपारा विधानसभा मतदारसंघांतील लढतीचे चित्र आता बदलले आहे

महायुती, आघाडी तुटल्याने सहाही मतदारसंघांत बहुरंगी लढती
दीपक मोहिते , वसई
महायुती व आघाडी संपुष्टात आल्याने वसई व नालासोपारा विधानसभा मतदारसंघांतील लढतीचे चित्र आता बदलले आहे. या दोन्ही मतदारसंघांत सेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, बहुजन विकास आघाडी, मनसे, डावी लोकशाही आघाडी व अपक्ष असे ७ ते ८ उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. आज काँग्रेसचे मायकल फुर्ट्याडो, डाव्या लोकशाही आघाडीचे मनवेल तुस्कानो, बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर, अन्य काही डमी उमेदवारांनीही आपले अर्ज दाखल केले. या दोन्ही मतदारसंघांत आता उमेदवारांची भाऊगर्दी होणार आहे. भाजपाचे शेखर धुरी शनिवारी आपला अर्ज वसई मतदारसंघात दाखल करणार आहेत.
या राजकीय पक्षांचा काडीमोड झाल्यामुळे कार्यकर्ते मात्र सुखावले आहेत. यापूर्वी जागावाटपामुळे निवडणूक लढवण्याची संधी मिळत नव्हती. परंतु, आता सगळ्याच राजकीय पक्षांना २८८ जागा लढवता येतील. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. नालासोपारा येथे काल आ. क्षितिज ठाकूर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, तर भाजपाचे राजन नाईक हे उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पालघर येथे राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनीही काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. येथे बहुजन विकास आघाडीही उमेदवार उतरवण्याच्या तयारीत आहे. लवकरच याबाबतचा निर्णय जाहीर होऊन उद्या त्यांचा उमेदवारही आपला अर्ज दाखल करील. नालासोपारा येथे मनसेतर्फे विजय मांडवकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे, तर वसई व नालासोपारा या दोन्ही मतदारसंघांत सेनेची उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही. वसईत राष्ट्रवादीतर्फे राजाराम मुळीक यांचे नाव चर्चेत आहे. परंतु, राष्ट्रवादीतर्फे अद्याप अधिकृत यादी जाहीर झालेली नाही.
नालासोपारा येथेही ६ ते ७ उमेदवार रिंगणात उतरतील, अशी अपेक्षा आहे. मनसेने नालासोपारा येथे उमेदवार दिला आहे, परंतु वसईबाबत कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पालघर येथे बहुजन विकास आघाडीने गावित यांच्यासमोर उमेदवार उभा केला नव्हता. यंदा मात्र ही जागा लढवण्याची त्यांनी जोरदार तयारी चालवली आहे. काल दिवसभर मुंबईत घडलेल्या घडामोडींनंतर पालघर जिल्ह्यातील सहाही मतदारसंघांतील लढतीचे चित्र झपाट्याने बदलले. जिल्ह्यातील सहा मतदारसंघांपैकी वसई, नालासोपारा व पालघर या तीन जागा काँग्रेसकडे तर बोईसर, विक्रमगड व डहाणू हे तीन मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असे जागावाटप होते. परंतु, आघाडी तुटल्यामुळे आता सहाही जागांवर राष्ट्रवादी व काँग्रेस आमने-सामने उभे ठाकतील, अशी शक्यता आहे.
दुसरीकडे महायुतीमधील विक्रमगड वगळता अन्य पाचही मतदारसंघ सेनेच्या वाट्याला आले होते.
आता युतीही फिस्कटल्यामुळे भाजपाने सर्वच जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. सेनेने मात्र अद्याप यादी जाहीर न केल्यामुळे या सहा जागांवर उमेदवार कोण असतील, हे कळण्यास मार्ग नाही.
बोईसर येथे बहुजन विकास आघाडीचे विलास तरे यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपातर्फे सुरेश बसवंत उद्या येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भाजपाने ही जागा लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे येथील लढतीचे चित्रही बदलले आहे.