Join us  

महावितरणच्या अधिका-यास मारहाण करणाऱ्या तिघांना सहा महिन्यांची सक्तमजुरी व नऊ हजारांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2018 10:21 PM

वीजबिल वसुली व वीजमीटर तपासणी मोहीम राबविणा-या महावितरणाच्या अधिका-यांना घरामध्ये कोंडून मारहाण करणा-या तीन आरोपींना सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा व प्रत्येकी नऊ हजार रुपयांचा दंड नांदेड जिल्ह्यातील उमरी न्यायालयाच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी ठोठावला आहे.

मुंबई- वीजबिल वसुली व वीजमीटर तपासणी मोहीम राबविणा-या महावितरणाच्या अधिका-यांना घरामध्ये कोंडून मारहाण करणा-या तीन आरोपींना सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा व प्रत्येकी नऊ हजार रुपयांचा दंड नांदेड जिल्ह्यातील उमरी न्यायालयाच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी ठोठावला आहे.

उमरी येथील महावितरणाचे कनिष्ठ अभियंता सुनील कासनाळे हे 25 नोव्हेंबर 2012 रोजी आपल्या सहकारी कर्मचा-यांसोबत सिंधी या गावी वीजबिल वसुली व मीटरची तपासणी मोहीम राबवित होते. यावेळी शिवाजी पुयड हे अनधिकृतरीत्या आकडा टाकून वीज वापरत असल्याचे आढळून आल्यामुळे आकडा टाकून वीज चोरल्याबद्दलचा रितसर पंचनामा करीत असताना शिवाजी पुयड आणि अन्य दोघांनी घराचा दरवाजा बंद करून पंचनाम्याचे कागदपत्र फाडून टाकले. त्याचबरोबर पंचनाम्याचे चित्रीकरण करणारे कर्मचारी बालाजी ढेरे यांना उग्रसेन पुयड व मारोती पुयड या आरोपींनी हातपाय धरुन मारहाण करत मोबाईल काढून घेतला.तसेच इतर कर्मचा-यांनाही कागदपत्रे फाडत धक्काबुक्की करत मारहाण करण्यात आली. या प्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर सरकारी पक्षाने पाच साक्षीदार तपासले.  3 मार्च 2018 रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन. डी. जाधव यांनी उमरी तालुक्यातील सिंधी येथील नितीन बालाजी पुयड, उग्रसेन शिवाजी पुयड व मारोती शिवाजी पुयड या तिघांना 353, 342, 201, 504, 506 सह 34 या कलमांतर्गत प्रत्येकी सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा व प्रत्येकी नऊ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे अजीम खान यांनी काम पाहिले.

टॅग्स :तुरुंग