Join us  

महाविकास आघाडी सरकारकडून लोकशाहीची हत्या, गिरीश महाजनांची टीका

By महेश गलांडे | Published: November 04, 2020 3:17 PM

महाराष्ट्रात महाविकासाघाडीकडून ‘अघोषित आणीबाणी'द्वारे लोकशाहीची हत्या! लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारीता क्षेत्रावर हा मोठा आघात आहे, असे ट्विट गिरीश महाजन यांनी केले आहे

ठळक मुद्देमहाराष्ट्रात महाविकासाघाडीकडून ‘अघोषित आणीबाणी'द्वारे लोकशाहीची हत्या! लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारीता क्षेत्रावर हा मोठा आघात आहे, असे ट्विट गिरीश महाजन यांनी केले आहे

मुंबई - रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरून आता महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात कलगीतुरा सुरू झाला आहे. गोस्वामी यांच्या अटकेवरून भाजपा नेत्यांकडून ठाकरे सरकारला लक्ष्य करण्यात येत आहे. याबाबत कार्यकर्त्यांना राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी आवाज उठवा, मोर्चा काढा, राज्य सरकारचा विरोध करा अशा शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. तर, दुसरीकडे माजीमंत्री आणि भाजपा नेते गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य करत, ही लोकशाहीची हत्या असल्याचं म्हटलंय. 

महाराष्ट्रात महाविकासाघाडीकडून ‘अघोषित आणीबाणी'द्वारे लोकशाहीची हत्या! लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारीता क्षेत्रावर हा मोठा आघात आहे, असे ट्विट गिरीश महाजन यांनी केले आहे. तसेच, महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भूमिका मांडली म्हणून अर्णब गोस्वामींविरूद्ध महाविकासआघाडी सरकारतर्फे सूडबुद्धीने केलेल्या कार्यवाहीचा जाहीर निषेध!, असेही महाजन यांनी म्हटलंय.  

अर्णब गोस्वामींना अटक; रायगड पोलिसांची कारवाई

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना आज रायगड पोलिसांनी अटक केली आहे. पहाटे ५ वाजता मुंबई पोलिसांच्या सीआययु प्रमुख सचिन वाझे यांच्या पथकासह रायगड पोलीस त्यांच्या वरळी येथील घरी गेले होते. दीड तास पोलिसांशी हुज्जत घातल्यानंतर सात वाजता गोस्वामींना अटक केली. आधी एन एम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात डायरी नोंद करत अर्णब गोस्वामींना अलिबाग कोर्टात हजर केले.

काय आहे प्रकरण?

मुंबईतील सुप्रसिद्ध इंटेरिअर डिझायनर अन्वेय नाईक याने ५ मे २०१८ रोजी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अन्वेय नाईक यांच्या मृतदेहाशेजारीच त्यांच्या आईचा मृतदेह आढळला होता. अन्वेय मधुकर नाईक (५३) यांनी आर्थिक विवंचनेतून स्वत: आत्महत्या केली होती. त्यांच्या कॉनकॉर्ड या इंटेरियर डिझायनर कंपनीला व्यवसायात नुकसान झाले होते, त्यामुळे कर्जदार त्याच्याकडे पैशांचा तगादा लावत होते. याच तणावात त्याने आपले व आईचे जीवन संपविण्याचे ठरविले. अन्वेय नाईक यांनी आत्महत्या करण्यापूर्वी रिपब्लिकन टीव्हीचे मालक अर्णब गोस्वामी तर फिरोज शेख व नीतेश सारडा यांनी कामाचे पैसे दिले नसल्यामुळे आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामुळे या तिघांचीही चौकशी पोलिसांमार्फत करण्यात आली होती.

भाजप नेत्यांचं ठाकरे सरकारवर शरसंधान

चंद्रकांत पाटील म्हणतात

याबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, भारतातील नामवंत पत्रकार अर्णब गोस्वामी यांना इतर कोणत्याही प्रकरणात अडकावता येणार नाही म्हणून एका वास्तुविशारद आत्महत्या प्रकरणी जी केस २०१८ सालीच बंद झाली होती ती केवळ आणि केवळ सुडाच्या भावनेने पुन्हा उघडली गेली आणि त्यांना अटक करण्यात आली. भारतीय लोकशाहीची गळचेपी करणारी घटना आज घडली आहे. मी भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि त्याहून आधी एक भारतातील नागरिक म्हणून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो असं त्यांनी म्हटलं आहे.

आशिष शेलार म्हणाले

एका प्रकरणात राज्य सरकारला उघडे पाडले म्हणून पत्रकार राहुल कुलकर्णीला अटक केली, सरकार विरोधात सोशल मिडियावर बोलणाऱ्या निवृत्त नेव्ही अधिकाऱ्यांसह सामान्य माणसाला ठेचून काढणे नित्याचेच झाले. आता सरकारला खडा सवाल विचारणाऱ्या संपादकाच्या हातात बेड्या... वा रे वा लोकशाही सरकार! काँग्रेसच्या सहवासात बिघडले ठाकरे सरकार.. हाच का तुमचा लोकशाही कारभार? दुर्दैवाने, लोकशाहीचा आजचा काळा दिवस. महाराष्ट्र आणीबाणीच्या दिशेने? असा सवाल भाजपा नेते आशिष शेलार यांनी राज्य सरकारला विचारला आहे.

जावडेकर म्हणतात

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही या कारवाईचा निषेध केला आहे. जावडेकर यांनी ट्विट करत म्हटलंय की, मुंबईमध्ये पत्रकारितेवर जो हल्ला झाला तो निंदणीय आहे, आणीबाणीसारखी महाराष्ट्र सरकारची ही कारवाई आहे. आम्ही याचा निषेध करतो असं त्यांनी सांगितले आहे.

संजय राऊत अन् जितेंद्र आव्हाडांचं उत्तर 

'महाराष्ट्राच्या कायद्याचं राज्य आहे. इथे बदल्याच्या भावनेनं कारवाई होत नाही. कोणीही कायद्याचं उल्लंघन केल्यास पोलीस त्याच्याविरोधात कारवाई करतील,' असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. पोलिसांकडे सबळ पुरावे असतील, त्यामुळेच त्यांनी कारवाई केली असेल, असंही त्यांनी म्हटलं. 

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीदेखील अर्णब यांच्या अटकेचं समर्थन केलं आहे. 'ज्यांच्या कुटुंबाचा आधारच हिरावून नेला देवासमान आई हिरावून नेली अशा पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देणे हेच कोणत्याही कायद्याचे राज्य असलेल्या शासनाचे कर्तव्य होय,' असं आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

टॅग्स :गिरीश महाजनगुन्हेगारीअर्णब गोस्वामी