Join us  

महाविकास आघाडी सरकारने निर्सग चक्रीवादळग्रस्त मच्छिमारांची फसवणूक केली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 5:46 PM

मच्छिमार संघटनांचे राज्य सरकारवर आरोप

 मनोहर कुंभेजकर

मुंबई :  एसडीआरएफच्या प्रचलित दरानुसार १५% दरवाढ करून निर्सग चक्री वादळग्रस्त मच्छिमारांना बोटीच्या अशत:  दुरूस्तीसाठी १०,०००/- रुपये व पूर्ण नष्ट झालेल्या बोटींना २५,०००/-रुपये, अंशतः बाधीत झालेल्या जाळ्यांच्या दुरुस्तीसाठी ५,००० व पूर्णतः नष्ट झालेल्या जाळ्यांच्या दुरुस्तीसाठी ५,००० रुपये इतकी नुकसान भरपाई देण्याची घोषणा राज्य शासन निर्णय, महसूल व वन विभागाने जाहीर केली आहे. ही मदत तुटपूंजी मदत असून निर्सग चक्रीवादळग्रस्त मच्छिमारांची फसवणूक महाविकास आघाडी सरकारने केली असल्याचा आरोप नॅशनल फिश वर्कर्स फोरम( एनएफएफ)चे अध्यक्ष नरेंद्र पाटील व महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे ( एमएमकेएस) चे अध्यक्ष लिओ कोलासो यांनी केला आहे. शासनाने जाहिर केलेल्या या तुटपुंज्या नुकसान भरपाईचा या दोन्ही मच्छिमार संघटना जाहिर निषेध करत असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलतांना स्पष्ट केले.

 शनिवार दि, १३ जून  व रविवार दि, १४ जून रोजी रायगड व रत्नागिरी येथील जिल्ह्यामधील मच्छिमार गावांची निर्सग वादळामुळे झालेल्या नुकसान पाहणी नॅशनल फिशवर्क्स फोरम व महाराष्ट्र मच्छिमार कृति समितीचे कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल, सरचिटणीस किरण कोळी, उपाध्यक्ष राजन मेहेर व सचिव उल्हास वाटकरे यांनी दौरा केल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मत्स्यव्यसाय मंत्री, रायगड व रत्नागिरी  पालकमंत्री यांना ईमेल द्वारे विनंती पत्राद्वारे एकूण नऊ मागण्या केल्या होत्या.

राज्य शासनाना जुने निष्कर्ष बदलून खालील प्रमाणे निर्सग चक्रीवादळ ग्रस्त मच्छिमारांना त्वरीत रूपये २५ कोटी ची अर्थिक मदत करावी अशी मागणी महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने शासनाकडे केली होती.यामध्ये १ ते ३ सिलिंडर नुकसान ग्रस्त प्रति मासेमारी नौकांधारकांना बोटी दुरूस्त करता रूपये ०२.०० लाख अर्थिक मदत व ४ ते ६ सिलिंडर नुकसान ग्रस्त प्रति मासेमारी नौकांधारकांना रूपये ०५.०० लाख अर्थिक मदत अनुदान स्वरूपात करावी. पूर्ण निकामी झालेल्या नुकसान ग्रस्त प्रति मासेमारी नौकांधारकास १ ते ३ सिलिंडर ला रूपये ०५.०० लाख व ४ ते ६ सिलिंडर ला रूपये १०.०० लाख अर्थिक मदत अनुदान स्वरूपात करावी अश्या मागण्या केल्या होत्या.मात्र शासनाने जाहीर केलेली मदत ही मच्छिमारांवर अन्याय करणारी आहे. २५,०००/- मध्ये पूर्ण नष्ट झालेली बोट तयार कशी करणार? असा सवाल नरेंद्र पाटील व  लिओ कोलासो यांनी केला आहे.

बोटीला रंगरंगोटी करायला, मासेमारीसाठी बोट तयार करायला किमान १.००/- लाख रुपये लागतात. मग वादळग्रस्त बोट १०,०००/- रुपयांमध्ये दुरूस्ती कशी होणार? अशी तीव्र नाराजी समितीचे रचिटणीस किरण कोळी यांनी व्यक्त केली. 

सिंधुदुर्गच्या वेंगुर्ले पासून ते पालघरच्या झाई पर्यंतचे कोकणातील मच्छिमार हा प्रामुख्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा वर्ग आहे. आज पर्यंत बहुसंख्य मच्छिमार बंधू-भगिनी या शिवसेने सोबत आहेत. त्या विश्वासाला तडा जाऊ न देता आपण जातीने लक्ष घालून चक्रीवादळग्रस्त मच्छिमारांना  २५ कोटी रुपये आर्थिक मदत द्यावी तसेच मच्छिमारांच्या इतर समस्या देखिल लवकर सोडवा असे आवाहन रामकृष्ण तांडेल व किरण कोळी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले आहे.   

टॅग्स :चक्रीवादळनिसर्ग चक्रीवादळमहाराष्ट्रसरकार