अर्बन हाटमध्ये महाटूरिझमचे आरक्षण कार्यालय
By Admin | Updated: June 30, 2015 23:50 IST2015-06-30T23:50:10+5:302015-06-30T23:50:10+5:30
महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना व प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने सिडको व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने महाटूरिझम महामंडळ

अर्बन हाटमध्ये महाटूरिझमचे आरक्षण कार्यालय
नवी मुंबई : महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना व प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने सिडको व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने महाटूरिझम महामंडळ मर्यादित (एमटीसीएल) या महामंडळाची स्थापना केली आहे. पर्यटन क्षेत्राचा विकास व नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन व संवर्धन या उद्देशाने शासनाच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत नवी मुंबईकरांच्या सुविधेसाठी सीबीडी बेलापूर येथील सिडको अर्बन हाट येथे महाटूरिझमतर्फे नवीन आरक्षण कार्यालय सुरू करण्यात आले आहे.
या आरक्षण कार्यालयामुळे नवी मुंबईकरांना सुटीमध्ये महाराष्ट्रातील विविध पर्यटन स्थळांना भेटी देण्याचे नियोजन करता येणार आहे. महाटूरिझमच्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास व परंपरा जाणून घेण्याची व सृष्टीसौंदर्य व ऐतिहासिक वास्तू पाहण्याची संधी शहरवासीयांना मिळणार आहे. या आरक्षण कार्यालयामार्फत एमटीडीसी व इतर राज्यातील पर्यटन विभागाची निवासस्थाने शासनमान्य दरांमध्ये आरक्षित करण्याची सुविधा मिळणार आहे. सदर आरक्षण कार्यालय दुपारी १२.०० ते रात्री ८.०० वाजेपर्यंत खुले असणार आहे. (प्रतिनिधी)