महाराष्ट्राला मिळणार २५० मेगावॅट सौर ऊर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:07 IST2021-09-22T04:07:19+5:302021-09-22T04:07:19+5:30
मुंबई : टाटा पॉवरच्या मालकीची उपकंपनी टीपी सौर्य लिमिटेडला (टीपीएसएल) महाराष्ट्रात २५० मेगावॅट क्षमतेचा ग्रीड-कनेक्टेड सोलर फोटोव्होल्टाईक वीज प्रकल्प ...

महाराष्ट्राला मिळणार २५० मेगावॅट सौर ऊर्जा
मुंबई : टाटा पॉवरच्या मालकीची उपकंपनी टीपी सौर्य लिमिटेडला (टीपीएसएल) महाराष्ट्रात २५० मेगावॅट क्षमतेचा ग्रीड-कनेक्टेड सोलर फोटोव्होल्टाईक वीज प्रकल्प उभारण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेडकडून लेटर ऑफ इन्टेन्ट देण्यात आले आहे. टीपीएसएलला हा प्रकल्प दरांवर आधारित स्पर्धात्मक बोली आणि त्यानंतर ई-रिव्हर्स लिलावामार्फत देण्यात आला आहे.
धुळे जिल्ह्यात दोंडाईचा सोलर पार्कमध्ये २५० मेगावॅट सौर प्रकल्प उभारणीसाठी महाजेनकोने जाहीर केलेल्या बोलीमध्ये हे लेटर ऑफ इन्टेन्ट कंपनीला देण्यात आले आहे. या सौर प्रकल्पामध्ये निर्माण होणारी वीज खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडने मंजुरी कळविली आहे. वीज खरेदी कराराची अंमलबजावणी सुरू झाल्याच्या तारखेपासून १५ महिन्याच्या आत हा सौर ऊर्जा प्रकल्प सुरू केला जाईल.
टाटा पॉवरचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीर सिन्हा यांनी सांगितले, या मोठ्या प्रमाणावरील ग्रीड- कनेक्टेड सोलर फोटोव्होल्टाईक ईपीसी वीज प्रकल्पाचे काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद आहे. प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील एकंदरीत ऊर्जा क्षमतेमध्ये शुद्ध ऊर्जेचे प्रमाण अजून जास्त वाढेल. प्रकल्पामुळे टाटाची एकूण शुद्ध ऊर्जा क्षमता ४६११ मेगावॅट होईल, यामध्ये संस्थापित क्षमता २९४७ मेगावॅट तर १६६४ मेगावॅट क्षमता उभारणीचे काम सुरू आहे.