Join us  

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : साताऱ्यातील पराभवानंतर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 9:12 AM

साताऱ्यातल्या पोटनिवडणुकीतल्या पराभवावर उदयनराजे म्हणतात...

साताराः विधानसभा निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या झंझावाती प्रचारसभा झाल्या. पायाला जखमा असतानाही वयाच्या 80व्या वर्षी शरद पवार पायाला भिंगरी लावल्यागत फिरत असल्याचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले. साताऱ्यातील लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारसभेत शरद पवारांनी चक्क मुसळधार कोसळणाऱ्या पावसात सभेला संबोधित केले. पवारांची ही सभा सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी निर्णायक ठरली आहे आणि उदयनराजेंना पराभव पाहावा लागला.राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंचा 87,717 मतांनी पराभव केला, श्रीनिवास पाटील यांना 636620 एवढी मतं मिळाली असून, भाजपाच्या उदयनराजेंना 548903 एवढं मताधिक्य मिळालं आहे. शरद पवारांनी या विजयावर सूचक प्रतिक्रिया दिली होती. मान छत्रपतींच्या गादीला पण मत राष्ट्रवादीला ही घोषणा यशस्वी ठरल्याचं सांगत पवारांनी सातारकरांचे आभार मानले. आता उदयनराजेंनीही पराभवानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आज हरलो आहे पण थांबलो नाही, जिंकलो नाही पण संपलोही नाही. लोकसभा पोटनिवडणुकीत मतदान करणाऱ्या जिल्ह्यातील लाखों जनतेचे तसेच दिवस रात्र एक करून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे खूप खूप आभार, असं ट्विट करत उदयनराजेंनी कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. सातारा पोटनिवडणुकीतील विजयानंतर शरद पवारांनीही उदयनराजेंना चिमटे काढले होते. सातारच्या गादीबद्दल सर्वांना आदर आहे. गादीची प्रतिष्ठा न ठेवणाऱ्यांचा पराभव झाला, असा टोला शरद पवारांनी उदयनराजेंना लगावला. मान छत्रपतींच्या गादीला पण मत राष्ट्रवादीला' ही घोषणा यशस्वी; सातारकरांचे आभार' पक्षांतर करणाऱ्यांपैकी काही अपवाद सोडले तर पक्षांतर करणाऱ्यांना लोकांनी स्वीकारलं नाही. ज्यांनी पक्षांतर केली अशा लोकांबद्दल जनतेने नकारात्मक भूमिका घेतली. साताराकरांचे विशेष आभार मानतो, असं पवार म्हणाले. 

टॅग्स :उदयनराजे भोसलेमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019