महाराष्ट्र पोलीस, देना बँक विजेते

By Admin | Updated: February 5, 2015 00:57 IST2015-02-05T00:57:23+5:302015-02-05T00:57:23+5:30

मुंबई पोलिसांना २०-९ असे लोळवत नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय अभिनव सुपर चॅलेंज कबड्डी स्पर्धेच्या पुरुष गटाचे दिमाखदार विजेतेपद पटकावले.

Maharashtra Police, Dena Bank winners | महाराष्ट्र पोलीस, देना बँक विजेते

महाराष्ट्र पोलीस, देना बँक विजेते

मुंबई : पोलिसांच्या संघांमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात महाराष्ट्र पोलीस संघाने एकतर्फी खेळ करताना मुंबई पोलिसांना २०-९ असे लोळवत नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय अभिनव सुपर चॅलेंज कबड्डी स्पर्धेच्या पुरुष गटाचे दिमाखदार विजेतेपद पटकावले. त्याचवेळी महिला गटामध्ये देना बँक संघाने बलाढ्य मध्य रेल्वेला ११-७ असे नमवत विजेतेपद निश्चित केले.
गोरेगाव येथील शंकरराव साळवी कबड्डीनगरी येथे अभिनव कला क्रीडा अ‍ॅकॅडमीच्या वतीने पार पडलेल्या या स्पर्धेत पुरुषांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्र संघाने सुरुवातीपासून राखलेला धडाका अखेरपर्यंत कायम ठेवला. मध्यंतराला निर्णायक आघाडी घेतलेल्या महाराष्ट्राने प्रतिस्पर्धी मुंबई संघाला दबावाखाली आणले. यानंतर महेंद्र राजपूत आणि सुलतान डांगे यांनी लक्षवेधी चढाई व पकडीचा खेळ करताना संघाच्या विजेतेपदामध्ये मोलाचे योगदान दिले. त्याचवेळी वैभव कदमने मुंबई संघाकडून उत्कृष्ट पकडी करताना एकाकी झुंज दिली.
महिला गटातील अंतिम सामनादेखील एकतर्फीच रंगला. नवोदित देना बँक संघाने सनसनाटी विजय मिळवताना बलाढ्य मध्य रेल्वेला रोखून दिमाखात विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे राष्ट्रीय खेळाडूंचा भरणा असूनदेखील मध्य रेल्वेला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. सोनाली शिंगोले आणि अपेक्षा टाकले यांनी आक्रमक व खोलवर चढाया करताना मध्य रेल्वेचा वेग कमी केला. त्याचवेळी रेखा सावंत आणि ललिता घरड यांनी मोक्याच्या वेळी यशस्वी पकडी करताना संघाच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. पराभूत संघाकडून सोनाली, रुबीना शेख यांनी चमकदार खेळ केला. (क्रीडा प्रतिनिधी)

वैयक्तिक विजेते :
सर्वोत्कृष्ट अष्टपैलू :
च्महिला: अपेक्षा टाकळे
(देना बँक)
च्(पुरुष): महेंद्र राजपूत (महाराष्ट्र पोलीस)
सर्वोत्कृष्ट चढाई :
च्महिला : प्रमोदिनी चव्हाण (मुंबई पोलीस)
च्पुरुष : अभिमन्यू चव्हाण (मुंबई पोलीस)
सर्वोत्कृष्ट पकड :
च्महिला : रुबीना शेख
(मध्य रेल्वे)
च्(पुरुष): गिरीश हरनाक (भारत पेट्रोलियम)

Web Title: Maharashtra Police, Dena Bank winners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.