टाटांची पसंती महाराष्ट्रालाच

By Admin | Updated: May 7, 2014 05:49 IST2014-05-07T05:44:50+5:302014-05-07T05:49:00+5:30

देशातील अग्रगण्य अशा टाटा उद्योग समूहाने महाराष्ट्रात उद्योग, शिक्षण, पर्यटन आदी क्षेत्रात योगदानासाठी राज्य शासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची तयारी दर्शविली आहे.

Maharashtra is the only choice for Tatas | टाटांची पसंती महाराष्ट्रालाच

टाटांची पसंती महाराष्ट्रालाच

>रतन टाटांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट : राज्याच्या विकास योजनांसाठी संयुक्त कोअर ग्रुप
मुंबई : औद्योगिक प्रगतीबाबत गुजरातचा डंका वाजविला जात असतानाच देशातील अग्रगण्य अशा टाटा उद्योग समूहाने महाराष्ट्रात उद्योग, शिक्षण, पर्यटन आदी क्षेत्रात योगदानासाठी राज्य शासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची तयारी दर्शविली आहे. प्रख्यात उद्योगपती रतन टाटा यांनी मंगळवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. राज्याच्या विकास योजनांमध्ये टाटा समूहाचा सहभाग असावा आणि त्या दृष्टीने नियोजन व निर्णय घेण्यासाठी वरिष्ठ सचिव आणि टाटा समूहाचे अधिकारी यांचा संयुक्त कोअर ग्रुप स्थापन करण्यात आला.
विकासकामात शासनासोबत खासगी क्षेत्राचाही सहभाग असावा या मुख्य सचिवांच्या संकल्पनेला प्रतिसाद देत रतन टाटा यांनी फेब्रुवारीमध्ये मुख्य सचिव जे.एस.सहारिया यांची भेट घेतली होती. त्याचाच दुसरा टप्पा म्हणून मंगळवारी वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत टाटा यांची बैठक झाली. बैठकीनंतर टाटा यांनी मुख्यमंत्री चव्हाण यांची सदिच्छा भेट घेऊन बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली. यावेळी दोघांमध्ये सुमारे अर्धा तास राज्याच्या विविध विकासाच्या योजनांसदर्भात चर्चा झाली. (विशेष प्रतिनिधी)
-------------
महाराष्ट्र हे देशातील अग्रगण्य राज्य आहे, राज्याची ही ओळख टिकविण्यासाठी आणि विकासाच्या क्षेत्रात महाराष्ट्राने अन्य राज्यांना दिशा दाखिवण्यासाठी राज्य शासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची टाटा समूहाची तयारी आहे.
- रतन टाटा
 

Web Title: Maharashtra is the only choice for Tatas