Maharashtra Monsoon Session 2025: महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. शेतकरी कर्जमाफी, लाडकी बहीण योजना अशा अनेक मुद्द्यांवरून विरोधक सत्ताधारी पक्षाला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. यातच विरोधी पक्षनेते पद अद्यापही रिक्त असल्यावरून विरोधकांनी नाराजी व्यक्त करत सरकारवर निशाणा साधला.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश महाराष्ट्राच्या विधान भवनात येत असताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवणाऱ्या सरकारचा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करून निषेध केला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवणे हे विधिमंडळाच्या प्रथा-परंपरांना साजेसे नाही, त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कामकाजावर बहिष्कार टाकला, असे सांगत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली. यासंदर्भात विजय वडेट्टीवार यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे.
विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय कधी घेणार?
विरोधी पक्षनेते पदाबाबत महाविकास आघाडीतील आमदारांची बैठक पार पडली. त्यामध्ये भास्कर जाधव, अजय चौधरी, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड विजय वडेट्टीवार, सतेज पाटील हे आमदार उपस्थित होते. या बैठकीनंतर विरोधी पक्षनेते पदाचा मुद्दा सभागृहात मांडण्याचा निर्णय घेण्यात आला. विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय कधी घेणार? हा प्रश्न विधानसभा अध्यक्षांना सभागृहात विचारण्यात आला. याच मुद्द्यावरुन विरोधी पक्षाचे आमदार आक्रमक झाले. लवकरात लवकर विरोधी पक्षनेतेपदाची निवड करण्यात यावी, अशी मागणीही आमदारांनी केली. महाविकास आघाडीचे आमदार सभागृहातून थेट बाहेर येऊन त्यांनी विधान भवनाच्या पायऱ्यावर आंदोलन केले.
दरम्यान, गेल्या चार महिन्यांपासून विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे. विधानसभा अध्यक्षांकडे पाठपुरावा करूनही त्यावर निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे आता हा प्रश्न सभागृहात मांडा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांना दिले, असे समजते. विधिमंडळाच्या नियमानुसार विरोधी पक्ष नेते पद शिवसेनेला मिळावे, अशी मागणी आघाडीने सातत्याने सरकारकडे केली. विधानसभा अध्यक्षांना पत्र व्यवहार केला. परंतु, अध्यक्षांकडून अद्याप अधिकृत निर्णय झालेला नाही. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आमदारांसोबत चर्चा केली.