Join us  

MPSC आयोगाच्या अधिकाऱ्यांची चौकशी होणार; विजय वडेट्टीवार यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 7:20 PM

MPSC Exam Postpone : परीक्षा पुढे ढकलण्याबाबत सरकारला अजिबात कल्पना देण्यात आली नव्हती असं वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.

राज्यात एमपीएससीच्या (MPSC) पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याच्या निर्णयावरुन विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापुरात विद्यार्थ्यांची आंदोलनं सुरू आहेत. एमपीएससीच्या परीक्षा सलग पाचव्यांदा पुढे ढकलण्यात आल्याच्या निर्णयाबाबत सरकारला अजिबात कल्पना देण्यात आली नव्हती, अशी माहिती आता राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. 

विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करुन महत्वाची माहिती दिलीय. "माझ्या विभागानं मला न विचारताच सचिव स्तरावरुन परस्पर घेतलाला निर्णय आहे. मला याबाबत काहीही माहिती देण्यात आली नाही. मला अंधारात ठेऊन घेतलेला निर्णय असल्याने याबाबत चौकशी करण्यात येईल", असं ट्विट विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. (vijay waddetiwar tweets about enquiry of MPSC Commission officials)

राज्यात एमपीएससीची पूर्व परीक्षा १४ मार्च रोजी होणार होती. पण आज आयोगाकडून पुन्हा एकदा परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी थेट रस्त्यावर उतरुन ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. दरम्यान, राज्य सरकारमधील मंत्र्यांनीही विद्यार्थ्यांना वेठीस धरणं योग्य नसल्याचं म्हणत काँग्रेस नेत्यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय अन्याय कारक असल्याचं म्हटलं. 

मुख्यमंत्र्यांशी वडेट्टीवारांची फोनवर चर्चाविजय वडेट्टीवार कोरोना पॉझिटीव्ह असल्यानं रुग्णालयात दाखल आहेत. विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असल्याचं कळताच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला. "एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा रोष अतिशय योग्य आहे. याबाबत मुख्यमंत्र्याशी बोलणं झालं आहे. त्यांनीही याबाबतचा तातडीनं निर्णय घेणार असल्याचं मला सांगितलं आहे. ते स्वत: पत्रकार परिषद घेतील", असं वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.  

टॅग्स :विजय वडेट्टीवारएमपीएससी परीक्षापुणेपरीक्षा