Join us  

Maharashtra Flood : 'संजय राऊत आपल्या प्रात: सवयीप्रमाणे केंद्रावर दोषारोप करून मोकळे झाले'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 6:21 PM

'सर्वज्ञानी संजय राऊत आपल्या प्रात: सवयीप्रमाणे परत एकदा आपल्या ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणावर पांघरून घालण्यासाठी विरोधक व केंद्रावर दोषारोप करून मोकळे झाले आहेत', असे ट्विट वाघ यांनी केलं आहे.

ठळक मुद्दे 'सर्वज्ञानी संजय राऊत आपल्या प्रात: सवयीप्रमाणे परत एकदा आपल्या ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणावर पांघरून घालण्यासाठी विरोधक व केंद्रावर दोषारोप करून मोकळे झाले आहेत', असे ट्विट वाघ यांनी केलं आहे

मुंबई - गेला आठवडाभर वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या तुफान पावसामुळे मुंबई, कोकणासह सांगली, कोल्हापूर यांसारख्या अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत शेकडो जणांचा मृत्यू झाला. लाखो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. मुख्यमंत्र्यांचा दौरा झाल्यानंतर आता विरोधी पक्षातील नेत्यांचेही दौरे सुरू आहेत. त्यावरुन, शिवसेनेनं सामनातून विरोधकांना आणि केंद्र सरकारला टोला लगावला आहे. त्यानंतर, भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी राऊत यांच्यावर बोचऱ्या शब्दात टीका केली आहे. 

महाराष्ट्रातील दुर्घटनाग्रस्त भागांत राजकीय पर्यटन सुरू झाले आहे. ते थांबले तर मदत आणि पुनर्वसन कार्यास अधिक गती येईल. महाड, चिपळूणला सगळय़ात जास्त फटका बसला. तळिये गावातील दुर्घटना भयंकर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात बसून सरकारी यंत्रणेस कामाला जुंपत असतानाच तिकडे विधान परिषदेचे ‘वि. प. ने.’ दरेकर व माजी मंत्री महाजन हे धावाधाव करीत महाडला पोहोचायचा प्रयत्न करू लागले. शेवटी पाण्याच्या प्रवाहात त्यांना गटांगळय़ा खाव्या लागल्या व सरकारी यंत्रणेस होड्या वगैरे घेऊन त्यांना वाचवावे लागले, असे म्हणत शिवसेनेने विरोधकांवर टीका केली. शिवसेनेच्या टीकेला भाजपा नेत्यांनी उत्तर दिलंय.

भाजपा महिला आघाडीच्या चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्या प्रखर शब्दात टीका केली. 'सर्वज्ञानी संजय राऊत आपल्या प्रात: सवयीप्रमाणे परत एकदा आपल्या ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणावर पांघरून घालण्यासाठी विरोधक व केंद्रावर दोषारोप करून मोकळे झाले आहेत', असे ट्विट वाघ यांनी केलं आहे. त्यासोबतच, एक व्हिडिओ शेअर करत राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रशासनाने तळेया दुर्घटेनंतर तत्परतेनं मदत केली असती तर खूप लोकांचा जीव वाचला असता. तब्बल 16 तासांनी प्रशासन तेथे अवतरलं, प्रशासकीय बदल्यांना आपण प्राधान्य दिल्यानेच होतकरु अधिकारी बाजूला पडले जातात. त्यामुळे, सरकार पंगू होतं. गेल्या 2 वर्षात ठाकरे सरकारच्या कार्यकाळात निष्पाप लोकांना जीव गमवावा लागल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे.  

दरम्यान, पावसाचा जोर काहीसा ओसरल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक राजकीय नेतेमंडळींनी पूरग्रस्त भागांना भेटी दिल्या. यानंतर आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही शिवसेनेवर निशाणा साधला असून, जनता आता समोर येऊन राग व्‍यक्‍त करु लागल्‍यामुळे शिवसेना हादरुन गेली, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे. 

राज्याला प्रशासन अन् मुख्यमंत्रीही नाही

राज्याला प्रशासनही नाही आणि मुख्यमंत्रीही नाही. मुख्यमंत्री आले कोरोना घेऊनच आले. पाय पाहायला पाहिजे, पांढरे पाय आहेत का, अशी टीका नारायण राणे यांनी केली होती. यानंतर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी नारायण राणेंवर टीका केली होती. तसेच भास्कर जाधव यांच्या गैरवर्तनावरून भाजपतील अनेक नेत्यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. यानंतर आता सामनामधील अग्रलेखातून भाजपवर टीका करण्यात आली आहे. या टीकेला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्विटरवरून प्रत्युत्तर दिले आहे.  

टॅग्स :चित्रा वाघसंजय राऊतशिवसेना