Join us  

Maharashtra Government: भाजपाकडून मध्यावधी निवडणुकांची तयारी?; उद्या मुंबईत होणार महत्वाची बैठक 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 9:32 AM

तत्पूर्वी काही दिवसांपूर्वी भाजपाचे नेते जयकुमार रावल यांनीही राज्यात फेरनिवडणुका होतील तुम्ही तयारीला लागा असं विधान केलं होतं.

मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा न सुटल्याने राज्यावर राष्ट्रपती राजवटी लागू झालेली आहे. शिवसेनेनं जनादेशाचा अपमान केल्याने राज्यावर राष्ट्रपती राजवट लागली असा आरोप भाजपाकडून करण्यात आला. मात्र सत्तास्थापनेचं निमंत्रण मिळून सुद्धा शिवसेनेला आघाडीकडून पाठिंब्याचं पत्र मिळविता आलं नाही त्यामुळे राज्यातील हा तिढा सुटला नाही. 

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाने मुंबईत आमदार, खासदार आणि अन्य पदाधिकारी यांची महत्वपूर्ण बैठक बोलाविली आहे. या बैठकीत संघटनात्मक कार्यप्रणालीवर चर्चा करण्यात येणार आहे. गरज पडली तर मध्यावधी निवडणुकीच्या तयारीला लागा अशा सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आलेल्या आहे. 

तत्पूर्वी काही दिवसांपूर्वी भाजपाचे नेते जयकुमार रावल यांनीही राज्यात फेरनिवडणुका होतील तुम्ही तयारीला लागा असं विधान केलं होतं. त्यामुळे राज्यातील सत्तास्थापनेचा घोळ मिटला नाही तर राज्यात पुन्हा निवडणुका लागणार का हे पाहणं गरजेचे आहे. तूर्तास भाजपाकडून या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवण्याची भूमिका घेण्यात आली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना या तीन पक्षांनी मिळून राज्यात सत्तास्थापनेचा दावा केला तर पुन्हा निवडणुकीची शक्यता फार कमी आहे. मात्र जर या तीन पक्षांना अपयश आलं तर राज्यात निवडणुका होऊ शकतात. त्यामुळे संघटनात्मक मोठे फेरबदल करण्याचं भाजपाने ठरविले आहे. यामध्ये बुथप्रमुख ते प्रदेशाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. 

दरम्यान, राष्ट्रपती राजवट लागण्याचा प्रसंग राज्यावर ओढविणे, हे अतिशय दुर्दैवी आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अतिशय सुस्पष्ट जनादेश महायुतीला मिळाला होता. तथापि राज्यात सरकार स्थापन होऊ शकले नाही आणि त्यामुळे आपल्याला राष्ट्रपती राजवटीला सामोरे जावे लागले. आज राज्यापुढे अनेक प्रश्न आहेत.सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अवकाळी पावसाने आपला बळीराजा संकटात आहे. राज्यातील राजकीय अस्थिरतेमुळे राज्यात होणार्‍या गुंतवणुकीवर विपरित परिणाम होईल. सरकारचे दैनंदिन कामकाज प्रभावित होईल आणि त्यातून पर्यायाने जनतेचीच गैरसोय होते. सर्वच पक्ष या स्थितीचा गांभीर्याने विचार करतील आणि राज्याला स्थिर सरकार लवकरच मिळेल असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :भाजपानिवडणूकराष्ट्रपती राजवटदेवेंद्र फडणवीसशिवसेना