Join us  

Maharashtra Election 2019: बोरिवली बालेकिल्ल्यात भाजपाला 'आयात' उमेदवारांची गरज का पडतेय?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2019 5:32 PM

बोरिवली विधानसभा निवडणूक 2019 -उत्तर मुंबईमध्ये म्हणजे भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला, याठिकाणी दहिसर, गोरेगाव, बोरिवली या मतदारसंघात भाजपाचे आमदार युती नसतानाही निवडून आले होते

प्रविण मरगळे

मुंबई - राज्यभरात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही शिवसेना-भाजपा एकत्र येत युतीत निवडणुका लढवित आहेत. मुंबईत लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपाला मोठ यश मिळालं आहे. त्यामुळे साहजिकच विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष मुंबईत जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. 

उत्तर मुंबईमध्ये म्हणजे भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला, याठिकाणी दहिसर, गोरेगाव, बोरिवली या मतदारसंघात भाजपाचे आमदार युती नसतानाही निवडून आले होते. बोरिवली मतदारसंघ हा भाजपाचा गड मानला जातो. 1980 पासून या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचा उमेदवार प्रत्येक विधानसभा निवडणुकीत निवडून येतो. त्यामुळे भाजपाच्या दृष्टीने बोरिवली मतदारसंघ सर्वात सुरक्षित मतदारसंघ मानला जातो. बोरिवली विधानसभेचं नेतृत्व राम नाईक, हेमेंद्र मेहता आणि त्यानंतर गोपाळ शेट्टी यांनी केलं आहे. 

2004 च्या निवडणुकीत पहिल्यांदा गोपाळ शेट्टी बोरिवली मतदारसंघातून 50 हजारांच्या मताधिक्याने निवडून आले. तर 2009 च्या निवडणुकीतही गोपाळ शेट्टी यांनी मतदारसंघात बाजी मारली होती. बोरिवली हा मतदारसंघ पाहिला तर, या मतदारसंघात मराठी भाषिकांसोबत गुजराती आणि अन्य भाषिकांची संख्याही लक्षणीय आहे. प्रामुख्याने हा समाज वर्षोनुवर्षे भाजपाला मानणारा आहे. 2009 च्या निवडणुकीत पहिल्यांदाच या मतदारसंघात मनसेने आपला उमेदवार दिला होता. त्यावेळी भाजपापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाची मते या मतदारसंघात मनसेला मिळाली होती. 

2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने गोपाळ शेट्टी यांना खासदारकीची तिकिट दिलं. गोपाळ शेट्टी लोकसभेत निवडून आल्यानंतर बोरिवली मतदारसंघात भाजपाची उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत अनेक चर्चांना उधाण आलं होतं. अशातच भाजपाकडून आयात उमेदवार म्हणून विनोद तावडेंना उमेदवारी देण्यात आली. विनोद तावडे यांच्या उमेदवारीबद्दल तेव्हाही स्थानिकांमध्ये अनेक चर्चा झाली होती. विलेपार्ले येथे स्थायिक असणाऱ्या तावडेंना या मतदारसंघातून उमेदवारी दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आलं होतं. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपाची युती न झाल्याने या मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळाली. तरीही या मतदारसंघात भाजपाच्या विनोद तावडेंनी 70 हजारांच्या मताधिक्याने बाजी मारली. यंदाच्या निवडणुकीतही विनोद तावडेंना पुन्हा या मतदारसंघातून उतरविलं जाईल अशी चर्चा होती. 

मात्र कालांतराने भाजपाकडून येणाऱ्या उमेदवारी यादीमध्ये विनोद तावडेंचे नाव नसल्याने या मतदारसंघात कोण उभा राहणार? याकडे सर्वांचे लक्ष होतं. बोरिवलीचे भाजपा नगरसेवक प्रविण शाह, उत्तर मुंबईचे भाजपा अध्यक्ष विनोद शेलार, तसेच मागाठाणेचे प्रविण दरेकर यांचीही नावे चर्चेत आली. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपाकडून जाहीर केलेल्या यादीमध्ये विनोद तावडेंचा पत्ता कट करुन सुनील राणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र हे सुनील राणे कोण? हा प्रश्न स्थानिक लोकांना पडला. सुनील राणे या नावाचे भाजपा पदाधिकारी ना बोरिवलीत आहेत ना उत्तर मुंबईत, मग हे सुनील राणे नेमके कोण? याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरु झाली. आज स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांकडून त्यांना विरोध होत आहे. हा विरोध नेमका कधीपर्यंत चालेल हा प्रश्नच आहे. 

बोरिवली मतदारसंघात गोराई-चारकोप यासारख्या मोठ्या प्रमाणात म्हाडा कॉलनी आहे. याठिकाणी मध्यमवर्गीय लोक वास्तव्य करतात. आजही चारकोप परिसरातील रहिवाशांना पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते. या मतदारसंघातील स्थानिक प्रश्न समजून घेण्यासाठी स्थानिक उमेदवार असणे गरजेचं आहे. भाजपासाठी हा मतदारसंघ सुरक्षित मतदारसंघ असला म्हणून बाहेरुन आयात केलेला उमेदवार पक्षाकडून का दिला जातो यावर चर्चा होणं गरजेचे आहे. 2014 मध्ये विनोद तावडेंना लोकांनी निवडून दिले त्यानंतर 2019 ला पुन्हा बाहेरुन आलेल्या उमेदवाराला भाजपाकडून तिकीट देण्यात आलं त्यामुळे मतदारसंघात स्थानिकांना का डावलण्यात येत आहे अथवा या मतदारसंघातील लोकांना भाजपाने गृहित धरलं आहे असा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित केला जाऊ शकतो.  

टॅग्स :बोरिवलीभाजपाशिवसेनानिवडणूक