Join us  

Maharashtra Election 2019 : बुलेट ट्रेनचा कोणाला उपयोग?, राज ठाकरेंचा मोदींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 9:38 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गोरेगावच्या सभेत मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेनवरून निशाणा साधला आहे.

मुंबईः मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गोरेगावच्या सभेत मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेनवरून निशाणा साधला आहे. बुलेट ट्रेनचा कोणाला उपयोग होणार आहे, असा प्रश्नही राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. ह्या बुलेट ट्रेनसाठी आदिवासींच्या जमिनी घेतल्या जात आहेत, कशासाठी?, ह्या बुलेट ट्रेनचा कोणाला उपयोग आहे?, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची जखम पुन्हा जिवंत करायचा हा प्रयत्न आहे का?, असा प्रश्नही राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. जपानकडून कर्ज घेऊन 1 लाख 10 हजार कोटींचा बुलेट ट्रेन प्रकल्प कोणासाठी उभारताय? काकोडकर समितीचा अहवाल आहे की देशातील रेल्वेचं जाळं सुधारायला फक्त 1 लक्ष कोटींची गरज आहे, त्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत पण निरुपयोगी बुलेट ट्रेनसाठी पैसे आहेत?, असं म्हणत मोदींच्या बुलेट ट्रेन प्रोजेक्टवरही राज ठाकरेंनी सडकून टीका केली आहे. 

तसेच राज ठाकरे म्हणाले की, बुलेट ट्रेनला मी एकट्याने विरोध केला. मेट्रोच्या कार शेडसाठी मी जागा सुचवली होती, आरेत कारशेड नको ह्यासाठी मी आंदोलनात पुढाकार घेतला होता. सरकारला सांगितलं होतं की जिथून मेट्रो सुरु होत आहे तिथे कार शेड करा. पण सरकारला कोणाच्या घशात ती जागा, बीपीटीची जागा घालायची आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

तुमच्या जगण्यातली प्रत्येक गोष्ट कोण निवडून येणार आहे, ह्यावर सगळं अवलंबून आहे. सरकार म्हणतंय की आम्ही 1 लाख 25 हजार विहिरी बांधल्या. मुंबईत रस्त्यांवर जे खड्डे पडलेत, त्या खड्ड्यांना मुख्यमंत्री 'विहिरी' म्हणत आहेत का? काय बोलतंय सरकार? आणि आता पुन्हा नवीन गोष्टी घेऊन हे सत्ताधारी तुमच्यासमोर येत आहे, जाहीरनामे येणार आणि जाणार, तुम्ही भूलथापांना बळी पडणार, तुमच्या मनात राग आहे का नाही? तुम्ही कधी बोलणार आहात की नाही?, असा प्रश्नही राज ठाकरेंनी जनतेला विचारला आहे. ही निवडणूक मी एवढ्यासाठी लढवतोय की तुमच्या मनातला राग, तुमच्या मनातला सरकारविरोधातला जो राग आहे तो व्यक्त करण्यासाठी ही निवडणूक लढवतोय, आम्हाला निवडून यायचं आहे, कारण सक्षम आणि प्रबळ विरोधी पक्ष नसेल तर सत्ताधारी पक्ष तुम्हाला हवं तसं चिरडून टाकेल, अशी टीकाही राज ठाकरेंनी केली आहे.  

यावळी ईडी चौकशीवर बोलताना राज म्हणाले की, मध्यंतरीच्या काळात निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याबाबत सर्वांशी बोललो, सर्व विरोधी नेत्यांची बोललो, पत्रकार परिषद घेतली. त्याच दरम्यान कोल्हापूर, सातारा, सांगली येथे पूर आला, त्यावेळी २१ तारखेला मोर्चा काढणार होतो ते राहून गेलो, ईडी चौकशीनंतर सांगितलं माझं थोबाड थांबणार नाही. मला फरक पडत नाही. हे महाराष्ट्राचं वातावरण आहे, जो राग सरकारबद्दल लोकांमध्ये आहे, तो राग व्यक्त नाही झाला तर निवडणुका घ्यायच्या कशाला? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. 

टॅग्स :राज ठाकरेमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019