Join us  

मुंबईत मतदारांमध्ये दिसला निरुत्साह

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 2:15 AM

Maharashtra Election 2019: मुसळधार पावसाच्या अंदाजाने धास्तावलेल्या राजकीय पक्षांनी कार्यकर्त्यांची फौज मतदार संघात उतरविली होती.

मुंबई : मुसळधार पावसाच्या अंदाजाने धास्तावलेल्या राजकीय पक्षांनी कार्यकर्त्यांची फौज मतदार संघात उतरविली होती. मतदार राजाला मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी व्यूहरचनाही आखण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात सोमवारी पावसाने विश्रांती घेतली, तरी मतदारांमध्ये निरुत्साह दिसून आला. त्यामुळे मतदान केंद्रांवर तुरळक गर्दी आणि कार्यकर्त्यांची धावपळ तेवढी पाहिला मिळाली.

सकाळी ७ ते ९ आणि दुपारनंतर शक्यतो मतदार गर्दी करीत असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे. मात्र, सायन, वडाळा आणि माहीम मतदार संघात पहिल्या दोन तासांमध्ये जेमतेम पाच ते आठ टक्के मतदान झाले होते, तर पुढील दोन तासांमध्ये यात फारसा फरक दिसून आला नाही. ज्येष्ठ नागरिक आपले कर्तव्य ओळवून मतदान केंद्राकडे वळले होते, परंतु तरुण मतदारांनी अनेक ठिकाणी पाठ फिरविल्याचे चित्र सायन कोळीवाडा मतदारसंघात दिसून आले.

वडाळा मतदारसंघ मात्र गजबजलेला व उत्साही दिसत होता. पुरंदरे स्टेडियम, न्यू सहकारनगर, नायगाव आणि वडाळा आगारसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील मतदान केंद्रात दुपारी ११ च्या दरम्यान मतदारांची गर्दी दिसून आली. या मतदारांना केंद्रापर्यंत आणण्यात राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही मोठा हातभार लावला होता. मतदान केंद्राबाहेर त्यांची लगबग दिसून येत होती.

दोन तासांनी केले मतदान

ज्येष्ठ नागरिक असलेले महेंद्र कोटक हे १९५६ पासून सायन कोळीवाडा मतदारसंघातील मतदार आहेत. प्रत्येक निवडणुकीत ते न चुकता मतदानाचा हक्क बजावतात. मात्र, यावेळेस यादीतील घोळामुळे त्यांचे नाव शोधण्यात तब्बल दोन तास गेले. त्यामुळे सकाळी ८ वाजता मतदान केंद्रावर आलेले कोटक यांनी १०.१५ वाजता अखेर मतदान केले.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019मतदानमुंबई