Join us  

Maharashtra Election 2019: ...म्हणून दाऊदला दारोदार भटकावे लागत आहे - योगी आदित्यनाथ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 1:28 AM

विधानसभा निवडणुकीनिमित्त योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी मुंबईत दोन सभांना संबोधित केले.

मुंबई : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या कठोर राजकीय इच्छाशक्तीमुळे दाऊद इब्राहिमला आज स्वत:ची कातडी वाचवत हिंडावे लागत आहे. तर, त्याला पोसणाऱ्या पाकिस्तानला दाऊद आमच्याकडे नाही, असा खुलासा करीत जगभर हिंडावे लागत आहे. राजकीय इच्छाशक्तीमुळेच हा बदल घडल्याचा दावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी केला.विधानसभा निवडणुकीनिमित्त योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी मुंबईत दोन सभांना संबोधित केले. कुलाब्यात राहुल नार्वेकर आणि कांदिवली येथे अतुल भातखळकर या भाजप उमेदवारांसाठी त्यांनी सभा घेतल्या. १९९३ साली मुंबईत स्फोट घडविणारा दाऊद इब्राहिम सध्या जीव वाचवत दडून बसला आहे. केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस सरकारने सुशासन आणि राष्ट्रवादाला वेगळ्या उंचीवर नेले आहे. नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांत देशातील राजकीय अजेंडाच बदलून टाकला आहे. पूर्वी जातीवाद, प्रांतवाद आणि परिवारवादाचे राजकारण होत असे. आता मात्र विकास, राष्ट्रवाद आणि आंतकवाद विरोध अजेंड्यावर आहे. काश्मिरातील ३७० चे कलम हटविण्याची कामगिरी त्याचेच द्योतक आहे. हे कलम हटवून मोदी सरकारने दहशतवाद्यांचे कंबरडेच मोडले आहे. त्यामुळे पाकिस्तान आज मगरीचे अश्रू ढाळत असल्याचे योगी म्हणाले.देशाची आर्थिक राजधानी असणारी मुंबई एकेकाळी दहशतवाद्यांचे सॉफ्ट टार्गेट होते. मोदी सरकारच्या काळात मुंबई पूर्णपणे सुरक्षित राहिली. तीन तलाकविरोधी कायदा करून मुस्लीम महिलांचे सशक्तीकरण केले. त्यालाही काँग्रेसने विरोधच केला. पाच वर्षांत दहशतवाद, नक्षलवाद अखेरच्या घटका मोजत आहे. जगभर भारताची डंका वाजत आहे. अमेरिका, इंग्लंड, रशिया, जर्मनी, जापान आणि चीनसारख्या देशांत आपली प्रतिमा उंचावली आहे. तर, महाराष्ट्रात फडणवीस सरकारने सर्वच क्षेत्रांत महाराष्ट्राला प्रगतिपथावर नेल्याचे योगी आदित्यनाथ म्हणाले.

टॅग्स :योगी आदित्यनाथकांदिवली पूर्वमुंबईमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019