Join us  

अभी तो मैं जवान हू.. कुठे डोंगर उतार तर कुठे सुविधांना नकार...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 3:28 AM

Maharashtra Election 2019: दुपारच्या सुमारास ८३ वर्षांचे आत्माराम जाधव हे आजोबा मतदानासाठी केंद्रावर धडकले.

मुंबई : दुपारच्या सुमारास ८३ वर्षांचे आत्माराम जाधव हे आजोबा मतदानासाठी केंद्रावर धडकले. आजोबांच्या मदतीसाठी पोलिसांसह अल्पवयीन स्वयंसेवक म्हणून शाळकरी मुलेही पुढे आली़ त्यांना व्हीलचेअरवर बसण्यासाठी आग्रह केला. तेव्हाच लटपटणारे पाय सावरत ‘अभी तो मैं जवान हू...’ म्हणत आजोबांनी ती व्हीलचेअर नाकारली आणि ज्यांना खरेच आवश्यकता आहे, त्यांना व्हीलचेअर द्या, असा सल्ला आजोबांनी दिला.

भांडुपच्या पवार पब्लिक स्कूलमध्ये दुपारी जाधव आजोबांनी मतदान केले. तसेच यंदा निवडणुकीच्या चोख व्यवस्थेबाबतही आभार मानत सर्वांनी मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले. तर दुसरीकडे १०० वर्षांचे खिल्लारीराम शर्मा यांनीही येथे मतदानाचा हक्क बजावला. आॅगस्ट महिन्यात त्यांचा शंभरावा वाढदिवस साजरा करण्यात आला. ते भांडुप पोलीस ठाण्यासमोरील कृष्णकुंज इमारतीत राहतात. ते व्यावसायिक आहेत. मतदानाच्या काही दिवस अगोदरपासूनच त्यांनी, सर्वांनी मतदान करावे यासाठी मोहीम छेडली. सोसायटीतील रहिवासी, मित्रमंडळींनी भेटून मतदान करायचे हा, असे अवाहन करत होते.

भांडुपमध्ये मतदानासाठी कायपण म्हणत आजोबांनी थेट डोंगर परिसर उतरून मतदान केंद्र गाठल्याचे चित्र भांडुपच्या उत्कर्षनगरातील यशवंत चांदजी शाळेतील मतदान केंद्राबाहेर पाहावयास मिळाले. रमाबाईनगर परिसरात गुलाबराव मारुती भोसले (८६) हे आजोबा राहतात. त्यांना मणक्याचा विकार जडल्याने ते चालू शकत नाहीत. डोंगराळ भाग उतरून त्यांनी पत्नी विमल (७१) सह केंद्र गाठले. एक व्होट भी बहोत बडी चीज होती है... त्यासाठीच हा चढउतार केला़

९३ वर्षांच्या आजींचा आदर्श

मतदानाची टक्केवारी घटत असताना घाटकोपरमधील हिराबेन पारेख या ९३ वर्षांच्या आजीबार्इंचा उत्साह मतदानाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारा होता. घाटकोपर (पू.)मध्ये आर.एन. जोरकर मार्गावरील उद्यान दर्शन इमारतीत एकट्याच राहात असलेल्या हिराबेन आजींनी आपण आतापर्यंत एकदाही मतदान चुकविले नसल्याचे सांगितले.

घाटकोपर पूर्व मतदारसंघात युवक-युवतींबरोबर वृद्ध मंडळींचेही मतदानाचे प्रमाण अधिक होते. केसरकर चाळीत राहत असलेल्या धनजी मराठी शाळेच्या केंद्रावर लीलावती लक्ष्मण सावंत या ९० वर्षांच्या आजीने मतदान केले, मुलांसमवेत त्या मतदानासाठी आल्या होत्या.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019मतदान