Join us  

Maharashtra Election 2019: विश्रांती, भेटीगाठीत उमेदवार व्यस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 2:56 AM

Maharashtra Election 2019: विजयाच्या आकड्यांची जुळवाजुळव; पदाधिकारी ‘नॉट रीचेबल’

मुंबई : प्रचाराच्या काळात आणि मतदानाच्या दिवशीही असलेले रखरखीत ऊन त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांच्या अपेक्षा, मानपान इत्यादीमुळे त्रस्त झालेल्या उमेदवारांना कधी एकदा मतदान संपते असे झाले होते. मतदानाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळचे सत्र आकडेमोडीत, तर उर्वरित दिवस कुटुंबासमवेत घालविला. विविध ठिकाणांहून आलेल्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन मतदानाच्या आकडेवारीचा मतदारसंघनिहाय आढावा घेतला. काही पदाधिकाऱ्यांनी ‘नॉट रीचेबल’ होऊन विश्रांतीसाठी शहराबाहेर जाण्यास प्राधान्य दिले. काही उमेदवार, समर्थकांनी हवापालट करण्यास पसंती दर्शविली.

राज्यभरात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामातील मतदानाचा टप्पा सोमवारी पार पडला. निवडणुकीची तयारी म्हणून सर्व प्रमुख पक्षांचे उमेदवार गेल्या महिनाभरापासून पायाला भिंगरी लावल्यागत फिरत होते. मतदारसंघातील प्रचारदौरा, भेटीगाठी, रॅली यांसारख्या बाबींत त्यांचा दिवस कधी जायचा हे त्यांनाही कळत नव्हते. सोमवारी मतदानानंतर हे सर्व उमेदवार प्रचारासह निवडणुकीच्या व्यस्ततेतून मुक्त झाले. उमेदवारांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करीत मतदारांचे आभारही मानले.

भायखळा विधानसभेतील सेनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी मंगळवारी कुटुंबीयांसोबत दिवस घालविला. शिवाय, सायंकाळी काही कार्यकर्त्यांची भेट घेऊन मतदानाचा आढावा घेतला. तर एमआयएमचे वारिस पठाण यांनी सकाळच्या वेळ कुटुंबीयांसोबत घालवून दुपारी विश्रांती केली आणि सायंकाळी मतदारसंघातील ठरावीक परिसरात कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. हितचिंतकांचे मानले आभारशिवडी मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार संतोष नलावडे यांनी कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्याला पसंती दिली. तर सेनेचे उमेदवार अजय चौधरी यांनी कार्यकर्त्यांसह बैठक घेऊन मतदानाचा आढावा घेतला.

आपल्याला मिळालेली मते, विरोधकांना मिळणाºया मतांची जुळवाजुळव करण्यात वेळ घालवला, त्यानंतर आपल्या निवडक समर्थकांसह त्यांनी श्रमपरिहार केला. काँग्रेसचे उदय फणसेकर यांनी सकाळी आपल्या कार्यकर्त्यांसोबत आकडेमोड केली. दुपारी कुटुंबासोबत वेळ घालवल्यानंतर त्यांनी विश्रांती घेतली. वरळी येथील राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश माने यांनी सकाळच्या सत्रात आकडेमोडीनंतर आपल्या हितचिंतकांचे आभार मानत हितगुज केले. आपल्या कुटुंबाला वेळ देत त्यांनीही चर्चा केली. त्यानंतर विश्रांती घेतली. तर वंचितचे गौतम गायकवाड यांनी कोणत्या मतदारसंघातून किती मते पडतील याचा अंदाज घेतल्यानंतर दिवस विश्रांतीत घालवला.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019मुंबईमतदान