Join us  

मतदारांच्या मदतीला येणार बाईकस्वार "मतदार मित्र",  वांद्रे पश्चिम मतदार संघातील अभिनव संकल्पना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2019 6:26 PM

मतदानाची टक्का वाढण्यासाठी सरकार व निवडणूक आयोग सतत प्रयत्नशील असते. विविध उपक्रम,पथनाट्य,कलावंत तसेच प्रसिद्धीमाध्यमांच्या जाहिरातीच्या माध्यमातून "मतदान करा" मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे असे आवाहन निवडणूक आयोगाकडून केले जाते.

- मनोहर कुंभेजकरमुंबई - मतदानाची टक्का वाढण्यासाठी सरकार व निवडणूक आयोग सतत प्रयत्नशील असते. विविध उपक्रम,पथनाट्य,कलावंत तसेच प्रसिद्धीमाध्यमांच्या जाहिरातीच्या माध्यमातून "मतदान करा" मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे असे आवाहन निवडणूक आयोगाकडून केले जाते.

मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी आणि मतदार हे मतदानापासून वंचित राहू नये यासाठी " बाईक स्वार मतदार मित्र" आपल्याला उद्या वांद्रे पश्चिम मतदान केंद्रावर दिसतील. शिवसेनेचे उपविभागप्रमुख जितेंद्र जानावळे यांनी या अभिनव संकल्पनेची आखणी केली आहे.या संकल्पनेचे या मतदार संघात स्वागत होत आहे. या अभिनव संकल्पनेबद्धल लोकमतशी बोलतांना जितेंद्र जानावळे यांनी सांगितले की,अनेक मतदारांना आपले मतदान कोणत्या केंद्रांवर, कोणत्या बूथ मध्ये आहे याची माहिती नसते.मतदान केंद्राच्या सुमारे 500 मीटर अंतराच्या बाहेर असलेेल्या  बूथवर मतदारयादीत आपले नाव कुठे आहे याची माहिती मतदार घेत असतात. मात्र आता मतदारांच्या सेवेला मोटर सायकलवर स्वार होऊन आता "मतदार मित्र" हजर असणार आहेत.यासाठी मतदारांची,त्यांचे मतदान कोणत्या केंद्रावर,कोणत्या बूथ वर आहे यासाठी टॅबचा उपयोग केला जाणार आहे. 

उद्या दि,21 या  मतदानाचा  दिवशी 12 मोटार सायकलवर स्वार होऊन वांद्रे (पश्चिम) विधानसभेत महाविद्यालयीन तरुण"मतदार मित्र" मतदारांच्या मदतीसाठी एक टॅब बॅग खांद्याला लटकावून त्यात मतदार रिकामी स्लीप, मतदारांच्या नावासहित टॅब बॅग खांद्याला लाऊन वॉर्ड निहाय या मतदार संघात फिरणार आहेत.

प्रत्येकी दोन असे सहा मोटारसायकल स्वार "मतदार मित्र" व "मतदान तुमचा अधिकार" असे छापलेले पांढरे टी शर्ट परिधान करून वांद्रे (पश्चिम) विधानसभेत रस्तोरस्ती, चाळ, सोसायटी मतदानाला जाणारे मतदार यांना भेटून त्यांना मतदान केंद्र, बूथ, अनुक्रमांक आदी माहिती टॅबच्या मदतीने जागेवर स्लीप भरून देऊन मार्गदर्शन करणार आहे.    आपण मुंबईत जसे स्विगी बॉय पाहिलेत,आता त्याच धर्तीवर निस्वार्थ सेवा करणारे "मतदार मित्र" तुम्हाला उद्या वांद्रे पश्चिम मतदार संघात बघायला मिळतील. या मतदार संघातील मतदानाचा अधिकार असणाऱ्या प्रत्येक मतदारांनी शतप्रतिशत मतदान केले पाहिजे हा आपला संकल्प असल्याची माहिती जानावळे यांनी लोकमतशी बोलतांना दिली.एक मत देखिल इतिहास  घडवू शकतो असे मत त्यांनी शेवटी व्यक्त केले.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019मुंबईमतदानवांद्रे पश्चिम