Join us  

११ नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात; तिघांची बंडखोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2019 3:42 AM

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत नऊ नगरसेवक आपापल्या पक्षातून उमेदवारी मिळविण्यात यशस्वी झाले आहेत, तर तीन नाराज नगरसेवकांनी बंडाचा ...

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत नऊ नगरसेवक आपापल्या पक्षातून उमेदवारी मिळविण्यात यशस्वी झाले आहेत, तर तीन नाराज नगरसेवकांनी बंडाचा झेंडा फडकवत शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याचप्रमाणे, सहा माजी नगरसेवकही निवडणुकीच्या रिंगणात आहे.२१ आॅक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मुंबईतील ३६ जागांकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. नगरसेवकांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले. नऊ नगरसेवकांना पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली आहे. दोन नगरसेवकांनी बंडाचा झेंडा फडकवत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. समाजवादी पक्षाचे गटनेते व नगरसेवक रईस शेख यांना भायखळा मतदारसंघ सोडून पक्षाच्या आदेशाने मुंबईबाहेर भिवंडीत निवडणूक लढवावी लागत आहे.विद्यमान नगरसेवकांची उमेदवारीशिवसेनेचे रमेश कोरगावकर यांना भांडुप (प.), दिलीप लांडे यांना चांदिवली मतदारसंघात तर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना वांद्रे (पूर्व) मतदारसंघामधून उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचे आसिफ झकेरीया यांना वांद्रे (प.), जगदिश अमीन कुट्टी यांना अंधेरी ( पूर्व) मधून उमेदवारी मिळाली आहे. मनसेचे संजय तुर्डे यांना कालिना मतदारसंघात उमेदवारी देण्यात आली आहे. अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी यांनी भायखळा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. घाटकोपर(पूर्व)मधून विद्यमान आमदार प्रकाश मेहता यांचा पत्ता कट करून नगरसेवक पराग शहा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.माजी नगरसेवकही सक्रिय..शिवसेनेने माजी नगरसेवक विठ्ठल लोकरे यांना मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघात, यामिनी जाधव यांना भायखळा मतदारसंघात उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेसनेही माजी नगरसेवक सुरेश कोपरकर यांना भांडुप (प.), माजी नगरसेविका अजंता यादव यांना कांदिवली (पूर्व) मतदारसंघात उमेदवारी दिली आहे.बंडखोर आजी-माजी नगरसेवक...काँग्रेसचे नगरसेवक सुफियान वणू यांनी मानखुर्द मतदारसंघात अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका राजुल पटेल यांनी वर्सोव्यातून, अंधेरी(पूर्व)मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार रमेश लटके यांच्या विरोधात बंड पुकारत भाजपचे माजी नगरसेवक मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याचप्रमाणे, घाटकोपर (प.) मतदारसंघात भाजपचे विद्यमान उमेदवार राम कदम यांच्याविरोधात शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय भालेराव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019मुंबईमुंबई महानगरपालिका