Join us  

Maharashtra CM: म्हणून छत्रपती संभाजीराजे संतापले; रवीशंकर प्रसाद बिनशर्त माफी मागा अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 9:08 PM

मात्र रवीशंकर प्रसाद यांनी बोलण्याच्या ओघात सुरुवातीला शिवाजी असा एकेरी उल्लेख केला. मात्र चूक लक्षात येताच त्यांनी छत्रपती शिवाजी असा शब्दप्रयोग केला.

मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेच्या घोळात भाजपा आणि शिवसेना एकमेकांचा खरपूस समाचार घेत आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपाने रात्रीस खेळ चालवला असून शिवरायांच्या महाराष्ट्राची दगा चालणार नाही अशा शब्दात भूमिका मांडली तर छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा शिवसेनेने करु नये अशी प्रतिक्रिया भाजपा नेते रवीशंकर प्रसाद यांनी मांडली. 

मात्र रवीशंकर प्रसाद यांनी बोलण्याच्या ओघात सुरुवातीला शिवाजी असा एकेरी उल्लेख केला. मात्र चूक लक्षात येताच त्यांनी छत्रपती शिवाजी असा शब्दप्रयोग केला. मात्र आज महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपण महाराजांच्या नावाचा उल्लेख एकेरी पद्धतीने केला आहे. शिवरायांचा एकेरी उल्लेख करायचा अधिकार या देशात कुणालाच नाही त्यामुळे केंद्रीय विधी व न्याय मंत्री रवीशंकर प्रसाद आपण आधी तमाम शिवभक्तांची माफी मागा अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजेंनी मांडली आहे. 

तसेच आजकालच्या आचार आणि विचार शून्य राजकारण्यांनी महाराजांचं नाव राजकारणात वापरू नये अशीही सर्व शिवभक्तांची भावना आहे. त्यामुळे केंद्रीय विधी व न्याय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी तात्काळ अन् बिनशर्त माफी मागावी असं संभाजीराजेंनी सांगितले आहे. राज्यातील सत्तास्थापनेबाबत बोलताना पत्रकार परिषदेत रवीशंकर प्रसाद म्हणाले की, ज्या शब्दांचा वापर शिवसेना नेत्यांनी पंतप्रधान, गृहमंत्री यांच्याविरोधात केला त्याबद्दल आम्हाला खंत आहे. स्वार्थासाठी शिवसेनेनं युती तोडली. बाळासाहेबांचा काँग्रेसविरोध प्रामाणिक अन् सर्वश्रूत होता, मात्र शिवसेनेला त्याचा विसर पडला. निकाल हा भाजपाचा नैतिक आणि राजकीय विजय होता असं त्यांनी सांगितले. 

तसेच विरोधात बसायचं होतं मग खुर्चीसाठी मॅच फिक्सिंग कोणी केली. शिवसेना कोणाच्या इशाऱ्यावर वागत होती? महाविकासआघाडीने एकदा तरी सत्तेचा दावा राज्यपालांकडे केला का? असा सवाल भाजपा नेते रवीशंकर प्रसाद यांनी करत भाजपा आणि अजित पवार यांचा गट एकत्र येत सत्तेचा दावा केला. नवीन युती स्थिर सरकार देणार आहे असा दावाही त्यांनी केला.  

टॅग्स :छत्रपती शिवाजी महाराजरविशंकर प्रसादभाजपासंभाजी राजे छत्रपती