Join us

Maharashtra Budget Session 2022: नवाब मलिकांच्या राजीनाम्याच्या मोहिमेवर उपाध्यक्षांची सही! भाजपतर्फे विधानभवनात स्वाक्षरी मोहीम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 05:31 IST

Maharashtra Budget Session 2022: नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपतर्फे विधानभवनात राबवण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेत उपाध्यक्षांनीच केलेली सही चर्चेचा विषय ठरली.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपतर्फे शुक्रवारी विधानभवन परिसरात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. त्यासाठीच्या बोर्डवर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सही केल्याने ही बाब दिवसभर चर्चेचा विषय ठरली.

मलिकांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी एक मोठा बोर्ड भाजपतर्फे ठेवण्यात आला होता. भाजपचे आमदार त्यावर एकेक करून सही करीत होते. एकेक मंत्री विधानभवनात येत होते आणि भाजपचे काही आमदार त्यांना सही करण्याची विनंती करीत होते. तेवढ्यात ग्रामविकास मंत्री व राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ, काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके हेही आले. त्यांनाही सहीची विनंती करण्यात आली, पण त्यांनी आधी चौकशी केली. नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी ही मोहीम असल्याचे समजताच, ते सही न करता निघून गेले. उपाध्यक्ष झिरवळ आले तेव्हा भाजपचे दोन-तीन आमदार त्यांना सहीसाठी आग्रह धरू लागले. कोणत्या कारणासाठी सही घेतली जात आहे याची चौकशी न करता झिरवळ बोर्डजवळ गेले आणि त्यांनी चक्क सही केली. 

मात्र, सही केल्यानंतर त्यांना मोहिमेचा हेतू समजला तेव्हा त्यांनी कपाळावर हात मारून घेतला, पण तोवर वेळ निघून गेली होती. झिरवळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे नेते आहेत. त्यामुळे आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांना हटविण्यासाठीच्या मोहिमेवर त्यांनी सही केली. त्यातच ते वैधानिक पदावर आहेत. त्यांना अशी सही करता येत नाही. 

उद्या विधानसभेत नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपकडून होईल तेव्हा झिरवळ यांचा या मोहिमेला पाठिंबा असल्याचा दावा त्यांच्या आजच्या सहीच्या आधारे भाजपकडून केला जाण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :महाराष्ट्र बजेटअर्थसंकल्पीय अधिवेशननवाब मलिक