Join us
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 05:36 IST

ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याच्या दिशेने वाटचाल

मुंबई : महाराष्ट्राच्या उद्योगस्नेही धोरणांमुळे व पायाभूत सुविधांमुळे देशातील सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताचे, पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे स्वप्न पूर्ण करताना त्यामध्ये महाराष्ट्राचा एक ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा सहभाग राहील, त्या दृष्टीने योग्य दिशेने मार्गक्रमण केले जात आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आयोजित उद्योग संवाद कार्यक्रमात केले. राज्य सरकार उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी त्यांच्या पाठीशी राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अनबलगन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासू उपस्थित होते. देश विकसित होत असताना त्यामध्ये महाराष्ट्राचा सर्वाधिक मोठा हिस्सा राहील. गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र हे आवडते राज्य आहे. 

विकासाची प्रक्रिया राज्यातील सर्व भागांत पोहोचवण्यासाठी उद्योगांची निर्मिती केली जात आहे, हे सांगताना त्यांनी गडचिरोलीचे उदाहरण दिले. गडचिरोलीला देशाची पोलाद उद्योगाची राजधानी बनवण्याचे उद्दिष्ट आहे. देशातील एकूण पोलाद उत्पादनापैकी एक तृतीयांश उत्पादन गडचिरोलीत केले जाईल, असेही ते म्हणाले. 

उद्योजकांची मानसिकता आणि मेहनत ही राज्याची खरी ताकद आहे, राज्याची वाटचाल घडवणारे तुम्ही आहात,  अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांचे कौतुक केले.

वाढवण जगातील पहिल्या १० बंदरांमध्ये असेल

वाढवण बंदर तयार झाल्यानंतर देशातील इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्र २० वर्षे पुढे जाईल. जगातील पहिल्या १० मोठ्या बंदरांमध्ये त्याचा समावेश होईल. वाढवण बंदरापासून समृद्धी महामार्गासाठी ॲक्सेस कंट्रोल रोड बनवण्यात येईल, त्यामुळे राज्यातील २० जिल्हे  वाढवण बंदराशी जोडले जातील. त्यामुळे लॉजिस्टिक खर्चात प्रचंड मोठी कपात होईल, वाहतुकीच्या कालावधी कमी होईल, असेही फडणवीस म्हणाले. 

मुख्यमंत्र्यांनी मांडला विकासाचा रोड मॅप...

सरकारने अमरावतीमध्ये वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी एक नवीन परिसंस्था निर्माण केली आहे.

छत्रपती संभाजीनगर हे एक नवीन औद्योगिक मॅग्नेट ठरले आहे. लवकरच ते भारताची ईव्ही राजधानी असेल. 

नाशिक हे संरक्षण क्षेत्रासाठी एक नवीन केंद्र आहे. नाशिक आणि अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरजवळ नवीन संरक्षण कॉरिडॉर तयार होत आहे. नाशिकमध्ये संरक्षण आणि अवकाश क्षेत्राला प्रोत्साहन दिले जाईल.

पुणे हे औद्योगिक आकर्षण आहे. नवी मुंबई आणि रायगडमध्ये जीसीसी, प्रगत उत्पादन, हरित तंत्रज्ञान आणि नवोपक्रमांसाठी एक नवीन परिसंस्था तयार होत आहे. 

पुण्यातील नवीन विमानतळ आणि पुणे रिंग रोडसह पुण्यात एक पूर्णपणे नवीन व्यवसाय आणि उद्योग, लॉजिस्टिक परिसंस्था तयार करण्याची तयारी सुरू आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्र उद्योग संवाद कार्यक्रमात राज्याच्या औद्योगिक प्रगतीला चालना देण्यासाठी धोरण, उत्पादकता, समृद्धता यावर झालेल्या चर्चासत्रात मंथन करण्यात आले. या परिषदेत १७ सत्रे झाली. त्यामध्ये ८० वक्त्यांनी सहभाग घेतला. उद्योजकांसोबत २३ देशांचे प्रतिनिधीदेखील सहभागी झाले होते.

रोल ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर इन इंडस्ट्री प्रमोशन या परिसंवादात पालिका आयुक्त भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव तथा मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे,  सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासु, महाजनकोचे अध्यक्ष राधाकृष्णन बी., उद्योजक शिरीष संखे यांनी सहभाग घेतला. उद्योजक अल्पेश कंकारिया यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसव्यवसाय