Join us  

महाराष्ट्रात दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्याला जुहूतून अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2018 6:26 PM

काही दिवस राहिल्यानंतर त्याला दुबईमार्गे पाकिस्तानच्या कराची येथे पाठविण्यात आले. त्यानंतर त्याची रवानगी पाकिस्तानातील एका दहशतवादी संघटनेच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये करण्यात आली.

मुंबई: पाकिस्तानातून दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण घेऊन मुंबईत परतलेल्या एका व्यक्तीला महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस)  ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. या व्यक्तीला 11 मे रोजी जुहू येथून ताब्यात घेण्यात आले होते. सदर व्यक्ती पाकिस्तानमधून दहशतावदाचे प्रशिक्षण घेऊन आल्याचे एटीएसचे म्हणणे आहे. एटीएसने प्रसिद्धीपत्रक काढून याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. एटीएसच्या माहितीनुसार, मुंबईतील एक ३२ वर्षीय व्यक्ती  पाकिस्तानमधील दहशतावादी संघटनांच्या प्रशिक्षण शिबिरात ट्रेनिंग घेऊन परतल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांकडून मिळाली होती. त्यानुसार जुहू युनिटच्या पोलिसांनी कारवाई करत 11 मे रोजी या तरुणाला ताब्यात घेतले. यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली असता धक्कादायक माहिती पुढे आली.

सदर व्यक्ती महाराष्ट्र व देशातील अन्य भागांमध्ये दहशतवादी हल्ले करण्याच्या तयारीत होता. एका बॉम्बस्फोट प्रकरणातील पोलिसांना हव्या असलेल्या आरोपीने या तरुणाला संयुक्त अरब अमिरातीतील शारजाह येथे बोलावून घेतले होते. त्यानंतर येथे काही दिवस राहिल्यानंतर त्याला दुबईमार्गे पाकिस्तानच्या कराची येथे पाठविण्यात आले. त्यानंतर त्याची रवानगी पाकिस्तानातील एका दहशतवादी संघटनेच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये करण्यात आली. येथे या तरुणाला काही दिवस शस्त्र चालवणे, बॉम्ब बनवणे, आत्मघाती हल्ले करणे, आग लावणे अशा घातक कृत्यांचे प्रशिक्षण देण्यात आले. कोलकाता एटीएस आणि मुंबई पोलिसांच्या मदतीने महाराष्ट्र एटीएसने हा कट उघडकीस आणला आहे. सदर व्यक्तीला कोर्टात हजर केल्यानंतर त्याला २१ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.      

 

टॅग्स :दहशतवादी हल्लापाकिस्तान