Join us

विरोध करणारा शेतकरी गायब, गुंडांचा उच्छाद; पवनचक्की कंपन्यांकडून धाराशीवमध्ये फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 10:40 IST

पवनचक्की कंपन्यांचे एजंट गुंडांना हाताशी धरून शेतकऱ्यांना मारहाण करतात, शेतकऱ्यांना चेक देतात, कामे करून घेतात, पण चेक बाऊन्स होतो. खोटे संमतीपत्र तयार केले जाते.

मुंबई : धाराशिव जिल्ह्यात पवनचक्की कंपन्यांकडून स्थानिक गुंड आणि पोलिस अधिकाऱ्यांना हाताशी धरून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याप्रकरणी येत असलेल्या सर्व तक्रारींची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानसभेत केली.

भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई

पवनचक्की कंपन्यांचे एजंट गुंडांना हाताशी धरून शेतकऱ्यांना मारहाण करतात, शेतकऱ्यांना चेक देतात, कामे करून घेतात, पण चेक बाऊन्स होतो. खोटे संमतीपत्र तयार केले जाते. या सगळ्यांची तक्रार घेऊन शेतकरी पोलिसांकडे गेले तर उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. कंपनीचे अधिकारी म्हणतात, आम्ही सगळ्यांना पैसे दिले आहेत.  आमचे काही होणार नाही, जो शेतकरी विरोध करेल तो गायब होतो, अशी धमकी देतात. पोलिस शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांना मारहाण करतात, पोलिस ठाण्यात डांबून ठेवतात. सरकार अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का ? असे सवाल उद्धव सेनेचे आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत विचारले.

२१० तक्रारी निकाली

पवन चक्कीप्रकरणी ३१३ तक्रारी आल्या, त्यात २१० तक्रारी निकाली निघाल्या. तर १०३ तक्रारींवर कार्यवाही सुरू आहे. धाराशिव जिल्ह्यात जे प्रकार होतात, त्यासाठी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. या प्रकरणांची त्या विभागाच्या पोलिस महानिरीक्षकांमार्फत चौकशी केली जाईल.चेक बाऊन्स प्रकरणातही कारवाईच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येतील, तसेच खोटी संमतीपत्रे प्रकरणी महानिरीक्षकांना चौकशीच्या सूचना येतील, असे आश्वासन राज्यमंत्री भोयर यांनी दिले.