महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने २० नोव्हेंबर रोजी बृहन्मुंबई शहरामध्ये मतदान होणार असून बृहन्मुंबई शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आयुक्त, विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सह आयुक्त (का. व सु.) यांच्या देखरेखीखाली बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेले आहे.
मुंबई पोलीस दलाकडून ५ अपर पोलीस आयुक्त, २० पोलीस उप आयुक्त, ८३ सहायक पोलीस आयुक्त यांच्यासह दोन हजाराहून अधिक पोलीस अधिकारी व पंचविस हजाराहून अधिक पोलीस अंमलदार, ३ दंगल काबु पथक (RCP) बंदोबस्तकामी तैनात करण्यात आलेले आहेत. तसेच वाहतूक विभागामार्फत स्वतंत्रपणे १४४ अधिकारी व एक हजाराहून अधिक पोलीस अंमलदार बंदोबस्त कर्तव्याकरीता नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांचेसोबत चार हजाराहून अधिक होमगार्ड इत्यादी असे मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. याशिवाय महत्वाच्या ठिकाणी व SST, FST सोबत असे २६ केंद्रीय सुरक्षा दले / राज्य सुरक्षा दले (CAPF / SAP) यांची निवडणूक कामी नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली.
४४९२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने आचारसंहिता लागू झाल्यापासून आजपर्यंत जवळजवळ १७५ कोटी रूपयांचे मूल्य असलेले रोख रक्कम, मूल्यवान धातू, दारू, अंमली पदार्थ इत्यादी जप्त केलेले असून विविध कायद्याअंतर्गत मुक्त आणि निष्पक्ष निवडणुक पार पाडण्याकरीता एकुण ४४९२ लोकांवर प्रभावीपणे प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.
नागरिकांनी सहकार्य करण्याचे मुंबई पोलिसांचे आवाहन
याद्वारे सर्व मतदारांस आवाहन करण्यात येत आहे की, विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३ मुंबई पोलिसांकडुन आदेश प्रसारीत करण्यात आले असुन मतदान केंद्रांच्या १०० मीटर परीघात (मतदान केंद्र परिसर) व अन्यथा नियमांचे पालन करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे. तसेच नागरीकांनी मदतीकरीता बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या मुख्य नियंत्रण कक्षातील हेल्पलाईन क्र. १००/१०३/११२ या क्रमांकांवर संपर्क साधावा.