आंबा निर्यातीमध्ये एकट्या महाराष्ट्राचा वाटा ६० टक्के

By नामदेव मोरे | Published: May 20, 2024 12:39 PM2024-05-20T12:39:58+5:302024-05-20T12:40:29+5:30

१९८७-८८ मध्ये २३ कोटी रुपयांचा आंबा निर्यात झाला होता. हा आकडा २०२३-२४ मध्ये ४११ कोटींवर पोहोचला आहे. यावरून जागतिक बाजारपेठेमधील आंब्याची लोकप्रियता लक्षात येते. शासनानेही आंबा निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक त्या सुविधा पुरविण्यास सुरुवात केली आहे.

Maharashtra alone accounts for 60 percent of mango exports | आंबा निर्यातीमध्ये एकट्या महाराष्ट्राचा वाटा ६० टक्के

आंबा निर्यातीमध्ये एकट्या महाराष्ट्राचा वाटा ६० टक्के

नामदेव मोरे, उपमुख्य उपसंपादक

भारतीय बाजारपेठेवर पाच महिने राज्य करणारा फळांचा राजा आंब्याला जगभरातून मागणी वाढू लागली आहे. युरोप, अमेरिकेसह ५० पेक्षा जास्त देशांमध्ये प्रत्येक वर्षी आंबा निर्यात होत आहे. गतवर्षी २८,२५९ टन आंब्याची निर्यात झाली असून, ४११ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. एकूण निर्यातीमध्ये ६० टक्के वाटा एकट्या महाराष्ट्राचा आहे.
आंबा ही प्रत्येक भारतीयाची प्रथम पसंती. विदेशात स्थायिक झालेल्या देशवासीयांसाठी काही दशकांपूर्वी आंबा निर्यातीची सुरुवात झाली. आता विदेशी नागरिकांनाही आंब्याची चव आवडू लागली आहे. १९८७-८८ मध्ये २३ कोटी रुपयांचा आंबा निर्यात झाला होता. हा आकडा २०२३-२४ मध्ये ४११ कोटींवर पोहोचला आहे. यावरून जागतिक बाजारपेठेमधील आंब्याची लोकप्रियता लक्षात येते. शासनानेही आंबा निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक त्या सुविधा पुरविण्यास सुरुवात केली आहे.

आंबा पिकविण्याची अत्याधुनिक पद्धत, निर्जंतुकीकरण ते वाहतुकीपर्यंतच्या सुविधेपर्यंत प्रत्येक गोष्टीकडे लक्ष दिले जात आहे. ‘जेएनपीटी’ बंदर व हवाई सुविधेमुळे महाराष्ट्र हे आंबा निर्यातीचे प्रमुख केंद्र झाले आहे. हापूससह देशाच्या इतर राज्यांतील आंबाही मुंबईतूनच विदेशात जातो. यामुळे एकूण निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा वाटा तब्बल ६० टक्के असून, प्रत्येक वर्षी तो वाढत आहे.

निर्यात होणाऱ्या आंब्याच्या आकारापासून ते दर्जापर्यंत प्रत्येक गोष्टीकडे लक्ष दिले जाते. निर्यातीसाठी बागांची मँगोनेटमध्ये नोंदणी करावी लागते. या बागांमधील आंब्यांपैकी दर्जेदार आंबा निर्यातीसाठी निवडला जातो. तो अत्याधुनिक पद्धतीने पिकविला जातो. यावर्षीही आंबा निर्यात मोठ्या प्रमाणात होत असून, मुंबई बाजार समितीमध्ये येणाऱ्या आंब्यापैकी ६० टक्के मालाची निर्यात हाेते.  

हापूस, तोतापुरी, केसर, पायरी, हिमायत, बदामी, लंगडा, दशेरी, चौसा, राजापुरी, नीलम व इतर आंब्यांची निर्यात होत असते. तोतापुरी, हापूस व केसर यांची सर्वाधिक निर्यात होते.

महाराष्ट्र राज्य पणन मंडळाने आंबा निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी नवी मुंबईमध्ये अत्याधुनिक सुविधा असलेले विकिरण केंद्र सुरू केले आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, न्यूझीलंड व इतर काही देशांमध्ये आंबा निर्यात करताना निर्जंतुकीकरण करावे लागते. पणन मंडळाच्या केंद्रामध्ये अत्याधुनिक पद्धतीने निर्जंतुकीकरण प्रक्रिया करण्यात येत असून, येथून जवळपास रोज १० टनांपेक्षा जास्त निर्यात होत आहे.

अमेरिकेमध्ये आंबा पाठविण्यासाठी त्याच्यावर रेडिएशन व व्हॉट वॉटर ट्रिटमेंट करावी लागते.ढयुरोपीय देशांमध्ये निर्यात करण्यासाठी एक तासाची व्हॉट वॉटर ट्रिटमेंट करणे आवश्यक असते. अमेरिका व ऑस्ट्रेलियासाठी तीन मिनिटांची व्हॉट वॉटर ट्रिटमेंट करावी लागते. यूकेसाठी व्हॉट वॉटर किंवा रेडिएशनची गरज नसते. व्यवस्थित पॅकिंग करून माल निर्यात केला जातो.

अमेरिकेचे निरीक्षक तीन महिने मुंबईत
अमेरिकेत पाठविण्यात येणाऱ्या आंब्याची त्यांचे निरीक्षक स्वत: पाहणी करतात. यावर्षीही अमेरिकन निरीक्षक भारतामध्ये आले आहेत. पणन मंडळाच्या केंद्रामध्ये आंब्याची तपासणी केल्यानंतरच तो निर्यात केला जातो. जपानच्या निरीक्षकानेही पाहणी केली आहे. यावर्षी साऊथ कोरियाचे निरीक्षकही आले असून, तेथेही निर्यात सुरू झाली आहे. मलेशियाच्या शिष्टमंडळानेही पाहणी केली असून, तेथेही आंबा निर्यात होणार आहे.

महाराष्ट्रातून निर्यातीचा तपशील
वर्ष     समुद्रमार्गे (टन)    हवाईमार्गे (टन)
२०२०- २१     १५,५९४     ३,२६७
२०२१- २२     १६,१८४     ४,४९६
२०२२- २३     १४,२४९     ४,४५९

Web Title: Maharashtra alone accounts for 60 percent of mango exports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mangoआंबा