Join us

महापरिनिर्वाण दिनी लोटला भीमसागर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 00:04 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरमध्ये हजारो भीमअनुयायी जमले आहेत.

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरमध्ये हजारो भीमअनुयायी जमले आहेत. त्यामुळे दादरला भीमसागराचे रूप आले आहे. महामानवाला अभिवादन करण्यासाठी जमलेल्या हजारो अनुयायींसाठी प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावत, सामाजिक संस्था व संघटनांनी वैद्यकीय सुविधा आणि भोजन व्यवस्था केलेली आहे.शिवाजी पार्कवर यंदा अंथरलेल्या हिरव्या रंगाच्या कापडी जाळीमुळे अनुयायींची धुळीच्या त्रासापासून मुक्तता झाली आहे. मंगळवारपासूनच हजारो अनुयायी बाबासाहेबांना अभिवादनासाठी चैत्यभूमीवर दाखल आहेत. बुधवारी सायंकाळीही अनुयायांची रांग मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचली होती. दादर रेल्वे स्थानकाकडून चैत्यभूमीच्या दिशेने येणाऱ्या अनुयायींना भीमसैनिक मार्गदर्शन करत होते.रस्त्यालगत बाबासाहेब, गौतम बुद्ध यांच्या मूर्ती आणि छायाचित्रे विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. याशिवाय बुद्धवंदना, संविधान आणि कॅलेंडरच्या प्रती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. मुंबई मनपाने शिवाजी पार्कवर अनुयायींची चोख व्यवस्था केलेली आहे. मैदानावर अंथरलेल्या हिरव्या चादरीमुळे धुळीच्या त्रासातून अनुयायींची मुक्तता केली. मोबाइल टॉयलेट्स आणि पिण्याच्या पाण्याच्या टाक्या लावत अनुयायांची सर्व व्यवस्था मनपाने केली आहे. याशिवाय आॅल इंडिया हिंदुस्तान पेट्रोलियम एससी-एसटी एम्प्लॉइज वेल्फेअर असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी २५ हजार लोकांची भोजनव्यवस्था केली होती. गुरुवारी दुपारी २ वाजेपर्यंत अल्पोपहारासह टोपी व पुस्तकांचे वाटप केले जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फेही शिवाजी पार्क मैदानावर वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.