महालक्ष्मी तिरूपती बालाजीची पत्नी नव्हेच..! -- महालक्ष्मीचा इतिहास बदलतोय ! भाग - २
By Admin | Updated: September 14, 2014 23:56 IST2014-09-14T22:36:39+5:302014-09-14T23:56:00+5:30
गैरसमजुतीतून बदलला इतिहास : येणारा शालू शास्त्रीय आधाराविना

महालक्ष्मी तिरूपती बालाजीची पत्नी नव्हेच..! -- महालक्ष्मीचा इतिहास बदलतोय ! भाग - २
इंदुमती गणेश - कोल्हापूर --केवळ अज्ञानातून कोल्हापूरची महालक्ष्मी ही तिरूपती बालाजीची पत्नी आहे, असा गैरसमज झाल्यामुळे गेल्या वीस वर्र्षांत या मंदिराचा मूळ इतिहास बदलला जात आहे.
वास्तविक अपमानाने रुसून कोल्हापुरात आईजवळ आलेली लक्ष्मी पुन्हा आपल्याला भेटावी म्हणून विष्णूने श्री येथील महालक्ष्मीची दहा वर्षे तपश्चर्या केली. तिच्या आज्ञेनुसार तिरूपती येथे जाऊन पुन्हा बारा वर्षे तपसाधना केली व महालक्ष्मीच्या आशीर्वादानेच तिरूपती येथे लक्ष्मी-विष्णूची भेट झाली, असा उल्लेख ब्रह्मांड पुराणात आहे. त्यायोगे महालक्ष्मी ही तिरूपती बालाजीची आई किंवा सासू होते, पत्नी नाही. वास्तविक महालक्ष्मी आणि लक्ष्मी या भिन्न देवता आहेत; त्यामुळे तिरूपती देवस्थानहून कोल्हापूर येथे येणाऱ्या शालूला कोणताही धर्मशास्त्रीय आधार नाही.
अपुरे ज्ञान किंवा गैरसमजुतीतून कोल्हापूरची महालक्ष्मी म्हणजेच तिरूपती बालाजीची पत्नी आहे, असा गैरसमज पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा झाला आणि त्यानंतर तिरूपती देवस्थानचाही झाला. मात्र, तिरूमला विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या ‘वेंकटाचल माहात्म्य’ या प्राचीन ग्रंथानुसार या घटनेचा इतिहास असा : भृगू ऋषींनी विष्णूच्या छातीवर म्हणजेच लक्ष्मीच्या स्थानावर लाथ मारल्याने अपमानित झालेली लक्ष्मी वैकुंठाचा त्याग करून आपल्या कोल्हापुरातील कपिल मुनींच्या आश्रमात वास्तव्याला आली. लक्ष्मी करवीरात आल्याचे समजल्यानंतर विष्णू कोल्हापुरात आले. येथे त्यांना अगस्ती मुनींनी वर्णन केल्याप्रमाणे श्री महालक्ष्मीची मूर्ती दिसली. त्यांनी पत्नीच्या पुन:प्राप्तीसाठी दीनवाणीने दहा वर्षे श्री महालक्ष्मीची तपश्चर्या केली. तपसिद्धीनंतर महालक्ष्मीने आकाशवाणीद्वारे विष्णूला तिरूमला येथील सुवर्णमुखरी नदीच्या उत्तर तीरावर बारा वर्षे तपश्चर्या कर, तेथेच तुला लक्ष्मीची प्राप्ती होईल, असे सांगितले. या आज्ञेनुसार विष्णूने पुन्हा बारा वर्षे तप:साधना केल्यानंतर लक्ष्मी-विष्णूचे पुनर्मिलन झाले. यानंतर लक्ष्मीने विष्णूसोबत न राहता करवीरात प्रस्थान केले. पुढे विष्णू-पद्मावतीच्या विवाहास लक्ष्मीने उपस्थित राहावे म्हणून सूर्य लक्ष्मीला बोलावण्यासाठी करवीरात आला. त्याचे प्रतीक म्हणून आजही किरणोत्सव होतो. अशा प्रकारे केवळ महालक्ष्मीच्या कृपेने विष्णू-लक्ष्मीची भेट झाली व तिरूमला देवस्थान निर्माण झाले, असा या क्षेत्राचा महिमा आहे.या कथाभागामुळे कोल्हापूरची महालक्ष्मी म्हणजेच विष्णुरूप तिरूपती बालाजीची पत्नी लक्ष्मी हा गैरसमज निर्माण झाला. देवस्थान समितीच्या तत्कालीन खजिनदारांनी दिलेल्या संदर्भानुसार चुकीचे तर्क लावले गेले. चुकीची गोष्ट सातत्याने जनमानसावर बिंबवली की ती गोष्ट खरी वाटू लागते, त्याचप्रमाणे अपुऱ्या ज्ञानातून मंदिराचा चुकीचा इतिहास भाविक व पर्यटकांसमोर मांडला जात आहे, जो कोल्हापूरच्या खऱ्या धार्मिक इतिहासाला बाधा आणणारा आहे. (क्रमश :)
शालू कसा येऊ लागला ?
साधारण १९८२ साली तिरूपती देवस्थानकडून आद्यशक्तिपीठ म्हणून महालक्ष्मीसह देशभरातील कनकदुर्गा, कामाख्या अशा विविध शक्तिपीठांना साडी अर्पण करण्यात आली. त्यानंतर गैरसमजातून १९८५ ला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे तत्कालीन अध्यक्ष अशोकराव साळोखे यांच्या काळात समितीचे तत्कालीन पदाधिकारी तिरूपती येथे गेले आणि तेथील व्यवस्थापनाला ही देवी विष्णुपत्नी असल्याचे सांगत त्यांनी दसऱ्याला देवीला साडी देण्याची विनंती केल्याचे समजते. वास्तविक या शालू पद्धतीला कोणताही धर्मशास्त्रीय आधार नाही. उलट यामुळे महालक्ष्मी मंदिराचा मूळ इतिहासच पुसला जातोय.
करवीर माहात्म्य, वेंकटाचल माहात्म्य यांचा संदर्भ
अगस्ती मुनी आणि लोपामुद्रेने तीर्थाटन करताना श्री महालक्ष्मीच्या माहात्म्याचे वर्णन आणि या देवतेचे पूजन केल्याचा उल्लेख करवीर माहात्म्यासारख्या स्थलपुराणात आहे. मात्र त्यात तिरूपती बालाजीचा उल्लेख नाही. श्री वेंकटाचल माहात्म्य या पौराणिक ग्रंथात विष्णूने लक्ष्मीला या क्षेत्राचा महिमा सांगताना ‘तयापश्यन महालक्ष्मीं अर्चारुपेण राजतीम! अगस्त्या..राधितां पूर्व प्रतिष्ठाप्यालयोत्तमे!!’ म्हणजेच तुझ्या शोधात कोल्हापुरात आल्यानंतर या ठिकाणी मी अगस्ती ऋषींनी आराधना केलेली श्री महालक्ष्मीची मूर्ती मंदिरात पाहिली आणि मी देवीसमोर तुझ्या प्राप्तीसाठी तपश्चर्या केली, असे सांगितल्याचा उल्लेख आहे. यासह स्पष्टपणे बालाजीची पत्नी लक्ष्मी आणि करवीर निवासिनी महालक्ष्मी या दोन भिन्न देवता असल्याचे म्हटले आहे.