Join us  

महाआयटीचा घोळ, सीईटी सेलची दिलगिरी!, प्रवेश वाटप यादी वेळेवर प्रसिद्ध न झाल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 5:17 AM

CET cell : या आधीही सीईटी सेल आयुक्तांकडून महाआयटीच्या सततच्या दुर्लक्षामुळे आणि त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींमुळे नोटीस बजावण्यात आली होती.

- सीमा महांगडे

मुंबई : महाआयटीकडून प्रसिद्ध होणारी कृषी प्रवेशाची दुसरी यादी १४ फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजल्यानंतर प्रसिद्ध होणे अपेक्षित होते, मात्र ती प्रसिद्ध न झाल्याने सीईटी सेलला दुसऱ्या यादीतील प्रवेश वाटप करता न आल्याने विद्यार्थी, पालकांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करावी लागली.   या आधीही सीईटी सेल आयुक्तांकडून महाआयटीच्या सततच्या दुर्लक्षामुळे आणि त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींमुळे नोटीस बजावण्यात आली होती. सुरुवातीला लॉकडाऊनमुळे उशिरा सुरू झालेल्या प्रक्रियांमध्ये महाआयटीसारख्या कंपन्यांमुळे विद्यार्थी, पालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, सीईटी सेल व उच्च शिक्षण विभाग याची दखल घेऊन महाआयटी संदर्भात काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दरम्यान, महाआयटीकडून प्रवेशाची दुसरी प्रवेश वाटप यादी प्रसिद्ध झाल्यावर सीईटी सेलमार्फत ती प्रसिद्ध करण्याची कार्यवाही करण्यात येईल आणि विद्यार्थ्यांना त्या प्रवेश निश्चितीसाठी सुधारित वेळ निश्चित केली जाईल, अशी माहिती सीईटी सेल आयुक्त चिंतामणी जोशी यांनी दिली. याआधीही कृषीच्या पदवी अभ्यासक्रमांची गुणवत्ता यादी २९ जानेवारीला जाहीर होणार होती. मात्र, यादी दोन दिवस उशिरा म्हणजे १ फेब्रुवारीला जाहीर झाली. विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाऊन कागदपत्रे तपासणीसाठी ३० जानेवारी ते ३ फेब्रुवारीएवढा वेळ देण्यात आला होता. त्यातच प्रवेशाच्या वेळी महायुतीची ऑनलाईन यंत्रणा कोलमडल्यामुळे विद्यार्थ्यांना आणखी मनस्ताप झाला. आता पुन्हा मनस्ताप विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. 

प्रक्रियेत पारदर्शकता  नसल्याचेच स्पष्ट   महाआयटीकडून राबविण्यात येणाऱ्या प्रक्रियेतही अनेक त्रुटी असल्याने सीईटी सेलने प्रवेश प्रक्रिया राबविण्यासंदर्भात वेळोवेळी आवश्यक सूचना त्यांना दिल्या आहेत. त्यामुळे महाआयटीकडून राबविण्यात येणाऱ्या प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचेच स्पष्ट झाले. 

टॅग्स :मुंबईशिक्षण