Join us  

१८ सप्टेंबरला होणार होती महादेव बुक अॅपची सक्सेस पार्टी, अनेक बॉलिवूड स्टार्स EDच्या रडारवर  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 11:17 AM

Mahadev Book App: सक्तवसुली संचालनालय (इडी)ने काल मुंबईतील एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या कार्यालयांमध्ये तपासणी केली. या कंपनीने अंडरवर्ल्डशी संबंधित सट्टेबाजी प्लॅटफॉर्म महादेव बुक अॅपच्या दुबईत होणाऱ्या सक्सेस पार्टीसाठी अनेक बॉलिवूड कलाकारांना साइन केलं होतं.

सक्तवसुली संचालनालय (इडी)ने काल मुंबईतील एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या कार्यालयांमध्ये तपासणी केली. या कंपनीने अंडरवर्ल्डशी संबंधित सट्टेबाजी प्लॅटफॉर्म महादेव बुक अॅपच्या दुबईत होणाऱ्या सक्सेस पार्टीसाठी अनेक बॉलिवूड कलाकारांना साइन केलं होतं. महादेव बुक अॅपविरोधात सक्तवसुली संचालनालय आणि छत्तीसगड पोलीस तपास करत आहेत.

फळांचा रस विकणाऱ्या सामान्य विक्रेत्यापासून सट्टेबाज बनलेल्या सौरभ चंद्राकर आणि त्याचा निकटवर्तीय असलेल्या रवि उप्पल यांनी महादेव बुक अॅपची सक्सेस पार्टी १८ सप्टेंबर रोजी दुबईमध्ये ठेवली होती. त्याची जबाबदारी मुंबईतील एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडे देण्यात आली होती. सौरभ हा अंडरवर्ल्ड डॉन आणि ग्लोबल टेरर फायनान्सर दाऊद इब्राहिमचा सहकारी मानला जातो. इडीने सौरभ आणइ रविविरोधात लुक आऊट सर्क्युलर जारी केलं आहे.

या इव्हेंट कंपनीने बॉलिवूडमधील एका बड्या कलाकाराशी पार्टीमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क साधला होता. एवढंच नाही तर या कंपनीला पार्टीमध्ये बॉलिवूड कलाकारांना बोलवण्यासाठी सौरभ चंद्राकर आणि रवि उप्पल यांनी सिमारे ४० कोटी रुपये दिले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता इडी पार्टीमध्ये सहभागी होण्यासाठी ऑफर आलेल्या त्या बॉलिवूड कलाकाराचीही चौकशी करण्याची शक्यता आहे. एवढंच नाही तर अनेक बॉलिवूड कलाकार महादेव बुक अॅपच्या प्रमोशनमध्ये सहभागी झाले होते. तपास यंत्रणा त्यांचीही चौकशी करण्याची शक्यता आहे.  

दरम्यान, या प्रकरणावरून भाजपा नेते मोहित कंबोज यांनी सनसनाटी आरोप केले आहेत. आयएसआयशी हातमिळवणी करणाऱ्या महादेव सट्टा किंग आणि इव्हेंट कंपनीने १५० कोटींचा कार्यक्रम कसा केला, हे सर्व आता समोर येईल. तसेच कुठले बडे बॉलिवूड कलाकार सट्टा किंगचं मनोरंजन करण्यासाठी इव्हेंट कंपनीच्या मदतीने दुबईला गेले होते. पाकिस्तानच्या इशाऱ्यावर मुंबईतून विमान भरून कोण गेलं होतं? असा सवाल कंबोज यांनी उपस्थित केला आहे.

 

टॅग्स :सट्टा बाजारगुन्हेगारीमुंबई