महाडमध्ये फुलला भक्तिसागर
By Admin | Updated: February 21, 2015 22:17 IST2015-02-21T22:17:33+5:302015-02-21T22:17:33+5:30
महाडकरांचे आराध्य दैवत असलेल्या श्री वीरेश्वर महाराजांचा छबिना उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला.

महाडमध्ये फुलला भक्तिसागर
महाड : महाडकरांचे आराध्य दैवत असलेल्या श्री वीरेश्वर महाराजांचा छबिना उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. संपूर्ण कोकणात सुप्रसिध्द असलेल्या या छबिना आणि जत्रोत्सवाला एक लाखापेक्षा अधिक भक्तांनी हजेरी लावली. आज सकाळी लळीताच्या कीर्तनाने या उत्सवाची सांगता करण्यात आली.
महाशिवरात्रीपासून या छबिना उत्सवाला प्रारंभ झाला. या निमित्त वीरेश्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते. शुक्रवारी सायंकाळपासून तालुक्यातील विविध गावच्या ग्रामदेवता आपल्या लाडक्या वीरेश्वराच्या भेटीसाठी वाजत गाजत मिरवणुकीने येत होत्या. सर्वात मानाची समजल्या जाणाऱ्या विन्हेरच्या झोलाई मातेच्या पालखीचे रात्री १ ते दीड वा. च्या सुमारास आगमन झाल्यानंतर भक्तांच्या उत्साहाला अक्षरश: उधाण आले होते. विरोबाचं चांगभलं, झोलाईचं चांगभलं अशा जयघोषांनी मंदिर परिसर अक्षरश: दणाणून गेला.
ढोल, नगारा आणि खालुच्या तालावर भक्तगण बेधुंद होऊन नाचत होते. झोलाई देवीच्या आगमनानंतर वीरेश्वर महाराजांचा गोंधळ विधी झाला. हा विधी पाहण्यासाठी हजारो भक्तगण उपस्थित होते. पहाटे ४ वाजता श्री वीरेश्वर महाराज आपल्या सर्व ग्रामदेवतांच्या पालखीसह मिरवणुकीने मोठ्या थाटात निघाले तो क्षण अत्यंत रमणीय होता. पेटवलेल्या हिलासांसह, नासण काठ्या देखील या मिरवणुकीत नाचवतानाचा क्षण डोळ्यांचे पारणे फिटणारा होता.
आ. भरत गोगावले, माजी आमदार माणिक जगताप, प्रांताधिकारी सुषमा सातपुते आदी मान्यवरांनी या छबिना उत्सवात उपस्थिती लावून नगारा वाजवण्याचा आनंदही लुटला. वीरेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. इतक्या मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊनही या उत्सवात कुठलाही गैरप्रकार सुदैवाने घडला नाही. छबिना उत्सव यशस्वीपणे पार पडण्यासाठी वीरेश्वर देवस्थानचे सरपंच दिलीप पार्टे, माजी सरपंच अनंत शेठ यांच्या मार्गदर्शनाखाली असंख्य कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली.
डीवायएसपी शिवाजीराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पो.नि. दिलीप शिंदे आदी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.