अंबरनाथमध्ये महाआघाडी, तर बदलापुरात युतीचे वर्चस्व

By Admin | Updated: June 2, 2014 23:13 IST2014-06-02T22:03:28+5:302014-06-02T23:13:20+5:30

अंबरनाथ पालिकेच्या पाचही विषय समित्या महाआघाडीने आपल्या ताब्यात घेतल्या आहेत, तर बदलापुरात युतीचे सर्व सभापती बिनविरोध निवडून आले आहेत.

Mahaagadi in Ambernath, and the alliance in Badlapur | अंबरनाथमध्ये महाआघाडी, तर बदलापुरात युतीचे वर्चस्व

अंबरनाथमध्ये महाआघाडी, तर बदलापुरात युतीचे वर्चस्व

विषय समिती निवडणूक : सभापती निवडणूक बिनविरोध
अंबरनाथ : अंबरनाथ पालिकेच्या पाचही विषय समित्या महाआघाडीने आपल्या ताब्यात घेतल्या आहेत, तर बदलापुरात युतीचे सर्व सभापती बिनविरोध निवडून आले आहेत.
अंबरनाथ नगर परिषदेच्या विषय समितीची निवडणूक दरवर्षी बंडखोरीमुळे गाजते. यंदा बंडखोरी रोखण्यासाठी काँग्रेस, रिपाइं, राष्ट्रवादी आणि मनसे यांची महाआघाडी आणि शिवसेना-भाजपा युतीने प्रयत्न केले. त्यामुळे ही निवडणूक दोघांसाठी प्रतिष्ठेची झाली. या निवडणुकीत महाआघाडीने सर्वच्या सर्व सभापतीपदे आपल्या ताब्यात घेतली आहेत. बांधकाम सभापतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे प्रदीप पाटील यांनी शिवसेनेचे अरुण सिंह यांचा एका मताच्या फरकाने पराभव केला. आरोग्य सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या वंदना पाटील यांनी शिवसेनेचे महादू फसाळे यांचा दोन मतांच्या फरकाने पराभव केला. नियोजन समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत मनसेचे संदीप लकडे यांनी अपक्ष उमेदवार सोनम घोडविंदे यांचा दोन मतांनी पराभव केला. लकडे हे सलग तीनवेळा सभापती होणारे एकमेव नगरसेवक आहेत. पाणीपुरवठा समितीच्या निवडणुकीत मनसेचे कुणाल भोईर यांनी शिवसेना समर्थक अपक्ष उमेदवार मुक्कू लेनिन यांचा एका मताच्या फरकाने पराभव केला. महिला बालकल्याण समितीच्या निवडणुकीत रिपाइंच्या सुधा गायकवाड यांनी शिवसेनेच्या रेखा शिंदे यांचा एका मताने पराभव केला. निवडणूक सुरू होण्याआधी राष्ट्रवादीच्या पाच नाराज नगरसेवकांनी सभागृहातच घोषणाबाजी करून सभात्याग केला. मात्र त्यांच्या या विरोधामुळे समितीच्या निवडणुकीवर आणि निकालावर कोणताही परिणाम झाला नाही. निवडणुकीदरम्यान शिवसेना समर्थक अपक्ष नगरसेवक याकुब मीरा सय्यद यांनी नियोजन समितीच्या निवडणुकीत तटस्थ राहून एकप्रकारे शिवसेनेच्या उमेदवाराला विरोध केला. त्याचा फायदा संदीप लकडे यांना झाला. तर शिवसेना समर्थक अपक्ष नगरसेवक अजित गायकवाड हे सभागृहात गैरहजर राहिल्याने त्याच्या फायदा वंदना पाटील यांना झाला. कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या सभापतीपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. राष्ट्रवादीने उमेदवारी दाखल न केल्याने युतीने सर्व समित्या आपल्या ताब्यात घेतल्या. बांधकाम समितीच्या सभापतीपदी शीतल राऊत, महिला बालकल्याण समितीच्या सभापतीपदी आरती टांकसाळकर, शहर नियोजन समितीच्या सभापतीपदी वामन म्हात्रे, आरोग्य सभापतीपदी राजन घोरपडे, पाणीपुरवठा सभापतीपदी चंद्रकांत म्हात्रे यांची निवड बिनविरोध झाली.

Web Title: Mahaagadi in Ambernath, and the alliance in Badlapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.