मुंबई : पारंपारिक भारतीय आणि पाश्चात्य तालवाद्यांचे सूर गाण्यात वापरून प्रत्येक गाणं अजरामर करणाऱ्या महान संगीतकार आर. डी. बर्मन अर्थात पंचमदांच्या संगीतरचनांवर आधारित एक वाद्य मैफल शनिवार, २३ नोव्हेंबर रोजी रात्री 8.30 वाजता बोरीवलीच्या प्रबोधनकार नाट्यगृहात रंगणार आहे. विशेष म्हणजे हा कार्यक्रम "इन्सट्रुमेन्टल" असल्याने पंचमदांनी छेडलेली वाद्यच इथे गाणार असून त्यांना साथसंगत केलेले प्रख्यात वादक कलाकार आपले कसब पेश करणार आहेत.
स्वरदा कम्युनिकेशन आणि एकदंत प्रतिष्ठानने 'मॅजिकल पंचम-इन्ट्रुमेंटल' या कार्यक्रमाचा योग जुळवून आणला आहे. पंचम म्हणजे संगीताचं एक युग... ते एक संगीताचं विद्यालयच होतं. पंचमदांनी शेकडो अजरामर गाणी दिली. 70 च्या दशकापासून आजपर्यंत प्रत्येक पिढीवर पंचमच्या सुरांचं गारुड आहे. आशाताईंचा ठसकेबाज आणि रोमॅन्टीक सूर, लतादिदींचा देवदुर्लभ मधाळ स्वर, किशोरदांसोबतचे अफाट कॉम्बिनेशन आणि रफिदांसोबतच्या जबरदस्त ट्युनिंगचा वापर करत पंचमदांनी त्यांच्या गाण्यात प्रत्येक वाद्याला अक्षरशः बोलतं केलं. याशिवाय, रेसॉ-रेसॉ, कॉकिटीका, पियानो, गिटार, अॅन्क्ल्युम, डुगीतरंग, मादल, क्लेव्ह, ट्रँगल, शेकर्स, क्लॅकर्स, घुंगरूतरंग, कोंगा इतकंच नव्हे तर रिकामी बाटली, कंगवा याचाही वापर करत पंचमदांनी प्रत्येक सुरावट रसिकांच्या हृदयात खुलवली आणि ओठांवर खेळवली.
दरम्यान, 'मॅजिकल पंचम-इन्ट्रुमेंटल' या कार्यक्रमात अॅकॉर्डियन सुराज साठे, पर्कशनिस्ट दीपक बोरकर, ट्रम्पेट प्लेयर वॉल्टर डायस आणि या सुरांना रिदमवरून एका उंचीवर नेणारे अनुपम घटक आणि त्यांची टीम हे या कार्यक्रमाचे वैशिष्ठ्य आहे. आर.जे. गौरव हे पंचमदांच्या जीवनातील मर्मबंधातल्या ठेवी उलगडून दाखवणार आहेत.