Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पाचे स्वागत अन् धूमधाम, माघी गणेशोत्सवाला प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 10:28 IST

माघ महिन्यातील गणेश जयंतीचे गणेशभक्तांना वेध लागते.

मुंबई : माघ महिन्यातील गणेश जयंतीचे गणेशभक्तांना वेध लागते. या निमित्ताने मूर्तिकारांनी मागील दोन महिन्यांपासून तयारी केली आहे. सर्वांचे लाडके आराध्य दैवत गणपती बाप्पा यांचा माघी गणेशोत्सव अर्थात, गणेश जयंती आज, १३ फेब्रुवारी रोजी असून, मुंबईतील विविध कारखान्यांमधील गणरायाच्या मूर्तींचे स्वागत करण्यासाठी भक्तगण उत्सुक दिसत आहेत. 

वास्तविक माघ महिन्यात घराघरात गणपती बाप्पा विराजमान करण्याचे प्रमाण दरवर्षी वाढत आहे. या कारणास्तव गणपती बाप्पाच्या विविध रूपांतील छोट्या व सुंदर मूर्ती भक्तांचे आकर्षण बनत आहेत. यासाठी मूर्ती कारखान्यांपासून ते बाजारपेठापर्यंत बाप्पाच्या स्वागताच्या खरेदीत भक्तगण मग्न झालेले दिसून येतात. दादर, लालबाग या बाजारपेठांमध्ये फुलांच्या खरेदीपासून ते सजावटीच्या वस्तू घेण्यासाठी भक्तांची वर्दळ दिसून आली. विविध रूपांतील गणपती बाप्पाच्या मूर्ती कारखान्यात दिसून येतात. 

मागील काही वर्षांपासून मूर्तींच्या रूपाबाबत भक्तांकडून विविध पसंतीक्रम असल्याचे दिसून येत असल्याचे मूर्तिकार सांगतात. १३  फेब्रुवारीला गणपती बाप्पाचे आगमन होत असून, १४ फेब्रुवारीला बाप्पाला निरोप दिला जाणार आहे.

श्री सिद्धिविनायक मंदिरही सज्ज :

 माघ शुद्ध प्रतिपदेपासून मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १३ फेब्रुवारीला श्रीगणेश जयंतीनिमित्त सायंकाळी चार वाजता श्रींची भव्य रथ शोभायात्रा निघणार आहे. पहाटे पाच वाजता श्रींची मंगलआरती व प्रार्थना होणार आहे. १४ फेब्रुवारीला आनंदन सिवमनी  वादन आणि गायनाचा कार्यक्रम सादर करतील, तर १५ फेब्रुवारीला सुरेश वाडकर संगीत रजनीत सहभागी होणार आहेत. १६ फेब्रुवारीला सायंकाळी संगीत रजनी कार्यक्रम पार पडेल.

टॅग्स :मुंबईसिद्धिविनायक गणपती मंदिर