उपेक्षित घटकांना संघटित करून न्याय देणाऱ्या मधूताई
By Admin | Updated: March 7, 2015 22:37 IST2015-03-07T22:37:34+5:302015-03-07T22:37:34+5:30
जमीन हक्काचा प्रश्न असो की श्रम करणाऱ्यांच्या हक्काची मजुरी, रेशन दुकानातून मिळणारे धान्य असो की, सरकारी दवाखान्यातील आरोग्य सेवा यांचा एकूण समाजव्यवस्थेशी संबंध आहे

उपेक्षित घटकांना संघटित करून न्याय देणाऱ्या मधूताई
हितेन नाईक ल्ल पालघर
जमीन हक्काचा प्रश्न असो की श्रम करणाऱ्यांच्या हक्काची मजुरी, रेशन दुकानातून मिळणारे धान्य असो की, सरकारी दवाखान्यातील आरोग्य सेवा यांचा एकूण समाजव्यवस्थेशी संबंध आहे हे कळायला लागल्यापासून समाजातील उपेक्षित घटकांना संघटीत करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी डहाणू तालुक्यातील मधू धोडी आजही कणखरपणे त्यांच्या मागे उभ्या आहेत. कष्टकरी संघटेनेच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या भरीव योगदानाची दखल घेऊन त्यांना आदिवासी सेवा पुरस्कारासह अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
डहाणू तालुक्यातील तलासरीजवळील आंबेसरी गावात एका वारली कुटुंबात १५ आॅगस्ट १९६७ रोजी मधू धोडी यांचा जन्म झाला. औपचारीक शिक्षण फारसे झाले नसले तरी केवळ पाचवीपर्यंत शिकलेल्या मधु धोडी यांची सामाजिक राजकीय प्रश्नांची जाण अतिशय चांगली आहे. त्यांचे आई-वडीलही पालघर जिल्ह्यातील आदिवासी हक्काच्या लढ्याशी जोडले असल्याने साहजिकच राजकीय, सामाजिक कार्याचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले.
समाजात दिसणाऱ्या अन्यायकारी घटनांसारख्या वातावरणात मोठ्या होणाऱ्या मधुताई हळूहळू कष्टकरी संघटनेच्या कामात कायमच्या जोडल्या गेल्या. १९९२ पासून त्या कष्टकरी संघटनेच्या पूर्णवेळ कार्यकर्त्या बनल्या. या त्यांच्या कामामुळेच त्या संघटनेची पालघर जिल्ह्यातील एक मेहनती, कणखर जिद्दीची प्रमुख कार्यकर्ती म्हणून ओळखल्या जातात.
वन हक्क, जमीन हक्क, रेशन, आरोग्य अधिकारी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अन्याय, अत्याचाराला विरोध करीत असताना आदिवासी समाजाचाच नव्हे तर सर्व नागरिकांना स्वशासनाचा अधिकार मिळवून देण्यासाठी संघर्षात्मक आणि विधायक अश दोन्ही प्रकारच्या कृतीसाठी लोकांना तयार करण्याचे अतिशय महत्वाचे पण कष्टाचे आणि जिकरीचे काम मधूताई आजही करताना दिसतात.
आदिवासी सहज शिक्षण परिवार संस्थेच्या वतीने दिला जाणारा शालीनीताई गोठोस्कर पुरस्कार, डॉ. वसंत अवसरे आणि डॉ. काशिनाथ अवसरे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा आदिवासी सेवा पुरस्कार त्यांना देऊन गौरविण्यातही आले आहे.