मुंबई : मालाड पश्चिम मढ कोळीवाडा येथील हेमदीप टिपरी यांच्या मालकीची आयएनडी-एमएच-२-एमएम ५२५१ या मासेमारी नौकेला शनिवारी (२९ डिसेंबर) मध्यरात्री १२.१० च्या सुमारास उत्तरेपासून सुमारे ७० मैल दूर खोल समुद्रात एका विदेशी मालवाहू जहाजाने टक्कर दिल्याने सदर बोट बुडाली.
या दुर्घटनेत या बोटीचे सुमारे ५० लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. तर या बोटीवरील १ तांडेल आणि ६ खलाश्यांना बाजूला मासेमारी करत असलेल्या सवटी ग्रुपच्या नौकांनी वाचवले.
या दुर्घटनेत हेमदीप टिपरी यांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक नुकसान कोसळले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सहाय्यता निधीतून या बोट मालकाचे आर्थिक पुनर्वसन करावे अशी मागणी महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांना केली आहे.
सवटी ग्रुपच्या आठ बोटीने सदर दुर्घटनाग्रस्त नौका बांधून आज दुपारी मढच्या तळपशा बंदरात आणली अशी माहिती त्यांनी दिली.