खुन्याला केले जेरबंद

By Admin | Updated: January 28, 2015 23:10 IST2015-01-28T23:10:07+5:302015-01-28T23:10:07+5:30

गुन्हेगार कितीही चलाख असो. त्याचा काहीतरी सुगावा राहतोच आणि तो पकडला जातो. असाच काहीसा प्रकार भिवंडीतील कामतघर जुनी ताजाळी भागात घडला

Made murderer | खुन्याला केले जेरबंद

खुन्याला केले जेरबंद

जितेंद्र कालेकर, ठाणे
गुन्हेगार कितीही चलाख असो. त्याचा काहीतरी सुगावा राहतोच आणि तो पकडला जातो. असाच काहीसा प्रकार भिवंडीतील कामतघर जुनी ताजाळी भागात घडला. एका फिरस्त्याचा खून झाल्यानंतर त्याची आणि खून करणाऱ्याची कोणतीही माहिती उपलब्ध नसताना गुन्हा दाखल होण्यापूर्वीच गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाने त्याचा छडा लावला.
‘जुनी ताजाळी येथील गणेश चौधरी यांच्या शेतात एका फिरस्त्याचे रक्ताने माखलेले शव पडलेले आहे,’ असा फोन ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल विक्रांत कांबळे यांना ४ डिसेंबर २०१४ ला सकाळी आला. त्याच माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक देविदास घेवारे, हवालदार गोविंद सावंत, शंकर कारंडे आदींचे पथक स्थानिक पोलीस पोहचण्याआधीच तिथे पोहचले. शांताराम नामदेव लोकरे (५५) या फिरस्त्याचा हा खून झाला होता. त्याच्या भुवयांच्या मध्यभागी जोरदार घाव घातलेला होता. त्याच्याबरोबर एक काळा सावळा आणि डोक्यावरचे केस मागे गेलेली व्यक्ती असायची. इतकीच माहिती या पथकाला जवळपासच्या लोकांकडून मिळाली. घटनास्थळी भाताची शिते, दारुच्या पिशव्या आणि काही पदार्थ पडलेले होते. एका खानावळीच्या ठिकाणी दोघे येऊन गेल्याची आणि असे फिरस्ते स्मशानभूमीत असतात, ही एक आणखी जुजबी माहिती मिळाली. त्यानुसार या पथकाने रमेश द्वारकानाथ वाघे या संशयिताला अवघ्या काही वेळातच गाठले. त्याच्या शेजारीच एक लाकडी दांडके मिळाले. त्याची पॅन्ट (रक्ताच्या डागामुळे) कडक झाली होती. लाकडी दांडक्यावरही काही प्रमाणात रक्ताचे (काहीसे काळे पडलेले ) डाग होते. पायावरही जखमा होत्या. एकाने मारल्याने या जखमा झाल्याचा दावा त्याने पोलीस चौकशीत केला. पण त्याच्या माहितीमध्ये विसंगती आढळल्याने त्याला ठाण्यात आणण्यात आले. तिथे त्याची ‘चांगली चौकशी’ करण्यात आली. अगदी त्याच्याच भाषेत ‘बोलते’ करण्यासाठी या पथकाने त्याला त्याचे आवडते ‘पेय’ही दिले. त्याच्यासोबत त्याच्या स्टाईलमध्ये खाली बसून क्राईम बॅ्रन्च कार्यालयाच्या आवारात जेवणही केले. ही मंडळी अगदी आपल्यासारखीच असल्याचा विश्वास मिळाल्यावर मात्र रमेश एकदम घडाघडा बोलू लागला....‘शांत्या मला मारायला आला होता. त्याने मला दारु आणायला सांगितली. पण मी ती आणली नाही. मग त्यानेच दारु आणली. पण त्यामुळे त्याने चिडून बहिणीवरुन शिवी दिली. यातून आमच्यात झटापट झाली. मग शांतारामला संतापाच्या भरात लाकडी दांडा मारला, तोच घाव त्याच्या वर्मी बसला.’ अशी कबुलीच रमेशने दिली. घटना ३ डिसेंबरच्या रात्री १२ वा. च्या सुमारास घडल्यानंतर पंचनामा आणि सर्व सोपस्कार होईपर्यन्त दुसरा दिवस उजाडला. म्हणजे ४ डिसेंबर रोजी दुपारी ४ वा. च्या सुमारास कोनगाव पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला. पुढे सखोल चौकशीत खूनी रमेश हाच असल्याचे उघड झाल्यानंतर रात्री त्याला अटक करण्यात आली.
मृतदेह शेतात पडलेला असल्याने कोनगाव आणि नारपोली या दोन पोलीस ठाण्यांत हद्दीवरुनही तर्कवितर्क सुरु होते. हद्द निश्चिती, पंचनामा आणि त्यानंतर गुन्हा दाखल होईपर्यन्त घेवारे यांच्या पथकाने इकडे छडाही लावला होता. केवळ लाकडी दांड्याला लागलेले रक्त, संशयित रमेशच्या पॅन्टवरील रक्ताचे काळे डाग यातूनच त्याला ‘बोलते’ केल्यानंतर त्याने आपला साथीदार शांतारामच्या खूनाची कबूली दिली. विशेष म्हणजे खून झाल्यानंतरही रमेश शांतारामच्याच बाजूला झोपला आणि सकाळी उठून तो तिथून पसार झाला...जसे काही झालेच नाही.... पण भिवंडीत खून झाल्याची माहिती ठाण्यातील क्राईम ब्रॅन्चला मिळाली आणि या खुन्यापर्यंत पोलीस पोहचले.
नुकतेच उपायुक्त झालेले भिवंडीचे तत्कालीन सहा. पोलीस आयुक्त खैरे यांच्यासह गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्त पराग मणेरे, सहा. आयुक्त नागेश लोहार कोनगावचे पोलीस निरीक्षक काळे या अधिकाऱ्यांनीही पथकाची पाठ थोपटली.

Web Title: Made murderer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.