मॅडमजी, ये फायर सेफ्टी क्या होता है?

By Admin | Updated: July 16, 2016 02:16 IST2016-07-16T02:16:52+5:302016-07-16T02:16:52+5:30

मुंबई दहा महिन्यांपूर्वी मुंबईत मन सुन्न करणारी घटना घडली होती. कुर्ल्यातील सिटी किनारा हॉटेलमध्ये गॅस गळती होऊन लागलेल्या आगीत आठ तरुणांनी जीव गमवला होता

Madamji, what is this fire safety? | मॅडमजी, ये फायर सेफ्टी क्या होता है?

मॅडमजी, ये फायर सेफ्टी क्या होता है?

मनीषा म्हात्रे,  मुंबई
मुंबई दहा महिन्यांपूर्वी मुंबईत मन सुन्न करणारी घटना घडली होती. कुर्ल्यातील सिटी किनारा हॉटेलमध्ये गॅस गळती होऊन लागलेल्या आगीत आठ तरुणांनी जीव गमवला होता. या घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या पालिका प्रशासनाने उपदेशांचे डोस पाजत छोटेखानी सुरु असलेल्या हॉटेलकडे मोर्चा वळविला. मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. सिटी किनारा हॉटेलला टाळे ठोकून फायली बंद झाल्या. प्रशासनाच्या कृपेमुळे सिटी किनारा सारखीची हॉटेल मुंबईकरांचा जीव धोक्यात घालून रस्त्यारस्त्यांत बिनदिक्कतपणे सुरु असल्याचे चित्र ‘लोकमत’च्या ‘रिअ‍ॅलिटी चेक’मधून समोर आले.
कुर्ला पश्चिमेकडील कमानी नगरातील सिटी किनारा हॉटेलमध्ये १६ आॅक्टोबर रोजी आग लागली. यामध्ये डॉन बॉस्को कॉलेजच्या विद्यार्थ्यांसह अन्य एका तरुणाचा बळी गेला होता. या अग्नितांडवानंतर खडबडून जाग आलेल्या मुंबई महापालिकेने सिटी किनारासारख्या मुंबईतील अन्य हॉटेलवर कारवाई सुरु केली होती. या कारवाई अंतर्गत अतिरिक्त सिलेंडर, खुर्च्या, त्यात फायर सेफ्टीचा नियम लागू करत सर्वांवर धडक कारवाई सुरु केली. त्यानंतर त्यांना सूचना करुन आगीच्या दृष्टीने हॉटेल सुरक्षित असल्याबाबतच फलक लावण्याचे आदेश बजावले. मुंबईकरांनाही असे सुरक्षेचे फलक लावलेल्या हॉटेलमध्येच जाण्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले होते. या कारवाईनंतरही या परिस्थितीतील स्थिती ‘जैसे थे’ अशीच आहे.
एक ते दोन महिने हा कारवाईचा वेग सुरु होता. आगीच्या दृष्टीने हॉटेल सुरक्षित असल्याबाबतच फलक लावण्याचे आदेश बजावले. मुंबईकरांनाही असे सुरक्षेचे फलक लावलेल्या हॉटेलमध्येच जाण्याचे उपदेश अग्निशमन दलाकडून देण्यात आले होते. शहरात रस्त्यारस्त्यावर तसेच गल्लोगल्लीत परवान्यासह अथवा विनापरवाना सुमारे ५० हजार हॉटेल आहेत. आहार संघटनेकडे मात्र अवघ्या १५ हजार हॉटेल्सची नोंद आहे. कायम धावपळीत असलेला मुंबईकर कमी पैशात जेवण मिळते, म्हणून अशाच हॉटेलचा आसरा घेतो. चायनिज कॉर्नर, चमचमीत फूड कॉर्नर तरुणांईच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. त्यामुळे पालिका आणि संबंधित यंत्रणांशी हातमिळवणी करुन सुरु असलेले हॉटेल्स मात्र धोकादायकच आहेत.
मुंबईतील याच हॉटेलच्या ‘लोकमत’ने केलेल्या रिअ‍ॅलिटी चेकमध्ये ९० टक्के हॉटेलचालकांना ‘फायर सेफ बोर्ड’ म्हणजे काय हेच ठाऊक नाही. ज्यांना माहिती आहे. त्यांनी हॉटेलच्या किचनमध्ये अग्निरोधक यंत्र लावल्याचे सांगून हातवर केले आहेत. तर अनेकांनी तर पालिका, पोलीस आणि अग्निशमन दलाकडून मिळालेल्या परवानगीला आपले सुरक्षा कवच मानून ग्राहकांच्या जिवाशी खेळ सुरु केल्याचे चित्र यावेळी पाहावयास मिळाले.

मुंबईतील खवय्ये खाण्यासाठीच्या नवनवीन जागा शोधत असतात. यामुळेच शहरातील अनेक छोटेखानी हॉटेलचीही मोठी चलती असते. अनेक जण नवीन हॉटेल ‘ट्राय’ करण्यासाठी हमखास जातात. अशी हॉटेल्स शोधण्याकडे तरुणांचा आणि मध्यमवयीन वर्गाचा कल अधिक असतो. छोटेखानी हॉटेलमध्ये चविष्ट पदार्थ मिळत असले, तरी तेथे कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेची काळजी घेतलेली नसते, हे मात्र वास्तव आहे. या हॉटेल्समध्ये अग्निरोधक यंत्र असणे आवश्यक आहे. ही यंत्रणा कशी हाताळावी, याचेही किमान ज्ञान हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना असणे गरजेचे आहे. मुंबईतल्या रस्त्यारस्त्यांवर, गल्लोगल्लीत असलेल्या हॉटेल्समध्ये ‘फायर सेफ्टी’ची कोणतीही काळजी घेतलेली नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. छोट्या अपुऱ्या जागेत सुरू असलेल्या या हॉटेल्समध्ये ‘फायर सेफ’चा बोर्ड कुठे तरी मिळेल, अशी आशा होती. पण ‘मॅडमजी, ये फायर सेफ्टी क्या होता है?’ असेच उत्तर या हॉटेल चालकांकडून मिळाले. मागच्या वर्षी कुर्ल्यातील सिटी किनारा हॉटेलमधील अग्नितांडवाचे साक्षीदार असलेल्यांकडूनच ही उत्तरे मिळाली. अशाच काही हॉटेलचे ‘लोकमत’ने केलेले हे रिअ‍ॅलिटी चेक...

१० बाय १० च्या छोट्याशा जागेत हे हॉटेल सुरू आहे. आतमध्ये मोजून १० ग्राहक बसतील एवढी जागा. प्रवेशद्वाराच्या अरुंद जागेत गॅसची शेगडी पेटवून तेथेच स्वयंपाकघर उभारण्यात आले आहे. या सर्वातून मार्ग काढत ग्राहक आतमध्ये जाऊन बसतात. अशा स्थितीत आगीचा प्रसंग उद्भवल्यास ग्राहकांना बाहेर पडण्यास कोणताही पर्यायी मार्ग नाही. सिटी किनारा हॉटेलपासून हे हॉटेल अगदी हाकेच्या अंतरावर असतानाही अग्निशमन दलाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून आले.

प्रतिनिधी : सरजी, यहाँ खुले मे ही सेगडी रखी है. आग लग गयी तो क्या करोगे?
हॉटेलचालक : आपको क्या करनेका मॅडम?
प्रतिनिधी : कितने सालसे यहाँ पर आपका हॉटेल है? फायर सेफ्टी के बारेमे कुछ खयाल रखा है या नही?
हॉटेलचालक : एक सालसे हमारा यहाँ पे हॉटेल है. ६ महिने पेहले यहा बाजू मेें आग लगने के बाद ८ लोग मर गये थे. इसलिये ६ महिने तक हॉटेल बंद था. उसके बाद ही शुरू किया है. और आग बुझाने के लिये लायसेन्स है ना मॅम...
प्रतिनिधी : लायसेन्ससे ही आग बुझेगी क्या? फायर डिपार्टमेंटने आपको परमिशन दी है क्या?
हॉटेलचालक : हाँ, सब परमिशन है हमारे पास. आग बुझाने की मशिन के बारे मे मुझे पता नही. वो तो मालिक को पता रहेगा. मैं तो यहाँ पे काम करता हूँ.
प्रतिनिधी : आपको डर नही लगता है, अगर यहाँ पर फिरसे आग लगी तो क्या करोगे? यहाँ ‘फायर सेफ बोर्ड’ भी नही है.
हॉटेलचालक : ये फायर सेफ्टी और सेफ बोर्ड क्या होता है? और आग लगी तो मालिक देख लेगा मॅडमजी... (एवढे बोलून या कर्मचाऱ्याने पुढे बोलण्यास टाळाटाळ केली. )

एकमजली असलेल्या या हॉटेलमध्ये आसन क्षमता तब्बल १०० इतकी आहे. आतील फर्निचर पूर्णपणे लाकडी आहे. हॉटेलमध्ये प्रवेश करताच डाव्या बाजूला किचन आणि उजव्या बाजूला वरच्या मजल्यावर जाण्यासाठी जिना आहे. त्यात किचन परिसरात फायर सिलिंडर लावलेली आहेत. हॉटेल स्टेशनलगत असल्याने येथे गर्दी खूप असते. मात्र प्रवेशद्वाराला आग लागल्यास आतून बाहेर पडण्यास ग्राहकांना कसरत करावी लागेल. ‘फायर सेफ बोर्ड’ येथेही दिसून आला नाही.

प्रतिनिधी : अंकल, यहाँ पे फायर सेफ का बोर्ड नहीं है? हमे कॉलेज में बताया था, की ऐसा बोर्ड लगाया जाता है.
मॅनेजर : अभी फिलहाल रिपेरिंग का काम चल रहा है. इसलिये नही लगाया है. मगर हमारे यहाँ पे उसका ध्यान रखा जाता है. एक बार रिपेंरिंग हो जायेगा तो वो बोर्ड लगाया जाएगा.
प्रतिनिधी : बोर्ड नही है, तो फायरवाले कुछ बोलते नही?
मॅनेजर : नही, वो काम चालू है? मगर जल्दी ही लगाया जाएगा. अभी मालिक नही है. मैं यहाँ पे सिर्फ मॅनेजर काम करता हूँ. बाकी सब मालिक को पता रहता है.


हॉटेलच्या वरच्या मजल्यावर केमिकल कंपनी आहेत. यापूर्वीही येथील कंपनीमध्ये आग लागली होती. तरीही येथे सुरक्षेसाठी कोणत्याही उपाययोजना केल्याचे दिसून आले नाही. हॉटेलच्या प्रवेशद्वाराजवळच चाट पदार्थांचा काउंटर आहे. तर डाव्या बाजूला स्वयंपाकघर आणि उजव्या बाजूला ग्राहकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. स्वयंपाकघर आणि ग्राहकांमध्ये एक माणूस उभा राहील एवढीच जागा आहे. या हॉटेलमध्ये आतल्या बाजूला एसी हॉल करून १५ ते २० जणांची बसण्याची सोय केली आहे. एखादी दुर्घटना घडल्यास येथील ग्राहकांना बाहेर निघण्यास मार्ग नाही. ‘फायर सेफ’चा बोर्ड नाही.


प्रतिनिधी : अंकलजी, फायर सेफ्टी के लिये आपके यहाँ पे क्या तैयारी है?
मालक (रजत अय्यर) : मॅम, बाहर बाटला और बादली रखी है. बाटले का हर साल रिफिलिंग किया जाता है.
प्रतिनिधी : उसको कैसे इस्तेमाल करते है?
मालक : उसके बारेमें ओ बाटलेपर लिखा है. वैसे ही उसका इस्तेमाल करेंगे.

एकमजली असलेल्या हॉटेलमध्ये ५० लोक बसू शकतील अशी आसनव्यवस्था आहे. अवघी ५ फूट उंची ठेवून वरचा मजला तयार करण्यात आला आहे. तेथे तीन एसी आहेत. याच्या खालीच हॉटेलचे स्वयंपाकघर आहे. त्यामुळे आग लागल्यास वरती बसलेल्या ग्राहकांना बाहेर पडणे अशक्य आहे. शिवाय बाहेरच्या बाजूस पावभावीचा काउंटर आहे.

प्रतिनिधी : बॉस यहाँ पे ‘फायर सेफ’ का बोर्ड नही है?
चालक (सिंग) : फायर सेफ्टी का बोर्ड हमारे किचन में है. और फायर का बाटला भी है. सालमे उसका रिफिलिंग होता है. फायरवाले चेक करते है.
प्रतिनिधी : फायर बोर्ड पब्लिक को दिखे ऐसे लगाना जरुरी नही लगता?
चालक : उसकी जरुरत नही है. हमे दिखता है यही बहुत है. (असे बोलून संबंधिताने बोलणे टाळले)

१० ते १२ ग्राहक बसतील इतकी क्षमता. हॉटेलच्या प्रवेशद्वारावर दोन ते तीन शेगड्या पेटवलेल्या होत्या. हॉटेलमध्ये लाकडी फर्निचर आहे. त्यामुळे येथे आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. ‘फायर सेफ ’ बोर्ड नाही. अग्निरोधक यंत्रणा नाही.

हॉटेलच्या प्रवेशद्वारावर बादली आणि फायर सिलिंडर लावलेले आहेत. पण इतकेच करून मालकाने हॉटेल आगीपासून सुरक्षित असल्याचा दिखावा केला आहे. हॉटेलच्या आतमध्ये दोन टेबलांमध्ये कमी जागा ठेवण्यात आली आहे. याच्या मागच्या बाजूस स्वयंपाकघर आहे. ‘फायर सेफ बोर्ड’ नाही.

प्रतिनिधी : दरवाजे पे ये बाटला क्यू लगाया है ?
चालक : अरे मॅडमजी, कभी आग लगी तो काम आएगा. उसके उपर लिखा है. वैसे इस्तेमाल करेंगे.
प्रतिनिधी : पिछले साल यहाँ पे आग लगी थी? उसके बाद भी आपको डर नही लगता?
चालक : हमारे पास ये बाटला है ना? तो डरने की क्या बात (असे म्हणत त्यांनी बोलणे टाळले. )

जनता रेस्टॉरंटमध्ये २० ते २५ ग्राहक एकाच वेळी बसतील एवढी क्षमता आहे. बाहेर ‘फायर सेफ’चा बोर्ड नाही. मालकाच्या म्हणण्यानुसार, तो स्वयंपाकघरात लावण्यात आला आहे. बोर्ड पाहता आला नाही.

प्रतिनिधी : सर, हे हॉटेल सेफ आहे, हे गिऱ्हाईकांना कसे कळणार? आम्हाला कॉलेजमधून याविषयी माहिती गोळा करायला सांगितली आहे.
चालक : हमे पता नहीं.
प्रतिनिधी : मगर यहाँ पे ‘फायर सेफ’ का बोर्ड होता है ना?
चालक : हाँ है ना. बाटला किचनमें लगाया गया है और बोर्ड भी वहीं पे है. (पुढे बोलण्यास टाळाटाळ केली )

अगदी छोटेखानी असलेल्या या हॉटेलमध्ये दोन भाग करण्यात आले आहेत. प्रवेशद्वारावर कोळशाची भट्टी पेटवून त्यात नान भाजले जातात आणि पदार्थ ग्रिल केले जातात. आतल्या भागात स्वयंपाकघर आहे. हॉटेलमध्ये एक काच टाकून आत दोन टेबल ठेवण्यात आली आहेत. हॉटेलमधील टेबलांमध्ये अवघ्या एक फुटाचे अंतर आहे. आग लागल्यास ग्राहकांना बाहेर पडता येणे शक्य नाही. ‘फायर सेफ’ बोर्ड नाही. अग्निरोधक यंत्रणा नाही.

माहीम रोड परिसरात असलेले हे हॉटेल छोट्याशा गाळ्यात सुरू होते. दरवाजातच काउंटर, त्यात आतमध्ये मोजून ५ माणसे बसतील एवढी जागा. आग लागल्यास बाहेर निघण्यास मार्ग नाही. ‘फायर सेफ’ बोर्ड नाही. अग्निरोधक यंत्रणा नाही.

अग्निशमन दल काय म्हणते... घोषणा फलक असणाऱ्या उपाहारगृहातील सेवांचा लाभ घ्या. अग्निसुरक्षा नियमांचे परिपूर्ण पालन व त्याबाबत घोषणा फलक लावणे आवश्यक. सर्व उपाहारगृहांच्या प्रवेशद्वारावर उपाहारगृह अग्निसुरक्षिततेच्या दृष्टीने परिपूर्ण असल्याबाबतचा फलक ठळकपणे लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्या उपाहारगृहातील अग्निसुरक्षा परिपूर्ण असेल; त्या सर्व उपाहारगृहांच्या प्रवेशद्वारांवर ‘हा परिसर अग्निसुरक्षिततेच्या दृष्टीने परिपूर्ण आहे’ असा संदेश असलेला व किमान ७५ मि.मी.पेक्षा अधिक आकाराच्या अक्षरात असलेला फलक ठळकपणे लावणे गरजेचे आहे.

Web Title: Madamji, what is this fire safety?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.