‘मॅडमजी, आओ छोड देता हूँ’..!
By Admin | Updated: December 16, 2014 01:45 IST2014-12-16T01:45:07+5:302014-12-16T01:45:07+5:30
पोलिसांनी सर्वच प्रकारच्या टॅक्सीचालकांची देशपातळीवरील गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्याची कवायतही सुरू केली.

‘मॅडमजी, आओ छोड देता हूँ’..!
देश हादरून सोडणा-या दिल्लीतल्या निर्भया प्रकरणाला १६ डिसेंबरला दोन वर्षे पूर्ण होतील. त्याआधीच दिल्लीतल्या उबर या खासगी टॅक्सीत टॅक्सीचालकाने शस्त्राच्या धाकात २५ वर्षीय तरुणीवर बलात्कार करून पुन्हा देशातल्या नोकरदार महिलांच्या मनात दहशत निर्माण केली. अशी घटना मुंबईत घडू नयेत, म्हणून पोलिसांनी सर्वच प्रकारच्या टॅक्सीचालकांची देशपातळीवरील गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्याची कवायतही सुरू केली. या पार्श्वभूमीवर देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही मध्यरात्री घराबाहेर पडलेल्या महिलांसाठी कितपत सुरक्षित आहे, हे जाणून घेण्यासाठी ‘टीम लोकमत’ ने मेगा स्टिंग आॅपरेशन केले. या वेळी महिला प्रवाशाला स्वत:हूनच काही वाहनचालक ‘मॅडमजी, आओ छोड देता हूँ !’ असे म्हणत बोलावत होते. ‘टीम लोकमत’ ने केलेल्या या स्टिंग आॅपरेशनमधील सहापैकी चार रूट्स महिलांसाठी धोकादायक ठरले.
रूट १ : मनीषा म्हात्रे (रिपोर्टर) सायन सर्कल
मार्ग : सायन सर्कल-बीकेसीचा कुर्ला साइडचा एंट्री पॉइन्ट
लोकमत’ प्रतिनिधी सायन सर्कल येथे रात्री पावणेएकच्या सुमारास पोहोचली. यानंतर रिक्षाच्या शोधात पुढे चालत प्रतिनिधी पादचारी पुलापर्यंत पोहोचली. तिथे उभ्या असलेल्या रिक्षाचालकांकडे विचारपूस केल्यावर एका रिक्षावाल्याने बीकेसी प्रवेशद्वाराजवळ सोडण्यास होकार दिला. प्रतिनिधीने रिक्षाचे भाडे किती घेणार याची चौकशी केली असता, त्याने रात्र असल्यामुळे १० ते २० रुपये जास्त आकारले जाणार, असे सांगितले. मात्र हे सांगत असताना तो मोबाइलवर काहीतरी टाईप करीत होता. हे पाहिल्यावर प्रतिनिधीच्या मनात शंका आली. पण तरीही नंतर जास्त पैसे नाही घेणार, असे सांगितल्यावर ती रिक्षा पकडली. रिक्षात बसल्यानंतर रिक्षाचालकाने वेगात रिक्षा सुरू केली. यानंतर त्याने कोणत्याही प्रकारचा संवाद साधण्याचा प्रयत्न केला नाही अथवा मागे पाहण्याचाही कोणताच प्रयत्न केला नाही. इच्छितस्थळी आल्यावर नक्की कुठे सोडू, असे विचारले. प्रतिनिधीने बस, इथेच सोडा, असे सांगेपर्यंत रिक्षा बीकेसी कुर्ला साइडच्या एंट्री पॉइन्टच्या पुढे गेलेली होती़ पण तत्काळ रिक्षा थांबवल्यानंतर फारसा धोका या मार्गावर जाणवला नाही.
रूट २ स्नेहा मोरे (रिपोर्टर) - वांद्रा- कुर्ला संकुल
१रात्री सव्वाएकच्या सुमारास वांद्रा-कुला संकुल सिटी बँकेच्या परिसरात ‘लोकमत’ प्रतिनिधीने चालायला सुरुवात केली. त्यानंतर ती प्रतिनिधी एकटी असल्याचे पाहून रस्त्यावरील बऱ्याच रिक्षाचालकांनी चौकशी केली. प्रतिनिधीला एकटी असल्याचे पाहून रस्त्याने ये-जा करणारे खासगी वाहनचालकही काहीसे घुटमळताना आढळले. बराच वेळ रस्त्यावर एकटी असल्यामुळे अनेक रिक्षाचालकांनी ‘इतनी रात को यहाँ?’, ‘मॅडम, आओ छोड देता हूँ’ असे म्हणत विचारणा केली.
२काही वेळाने ‘त्या’ प्रतिनिधीने एका रिक्षाला थांबवून वांद्रे टर्मिनस सोडण्याबद्दल विचारणा केली. रिक्षात बसल्यावर वांद्रा-कुर्ला संकुल हायवेवरून रिक्षा वेगात वांद्रा टर्मिनसच्या दिशेने निघाली. प्रवासादरम्यान रिक्षाचालकाने ‘लोकमत’ प्रतिनिधीची विचारपूस केली. त्यात ‘इतनी रात गए ठंड में आप अकेली कहाँ जा रहीं हो?’ असे विचारले. त्यानंतर प्रवासादरम्यान रिक्षाचालकाची बारीक नजर प्रतिनिधीच्या हालचालींवर होती. कलानगर जंक्शन फ्लायओव्हरखालून जाताना चालकाने रिक्षा वेगात सोडली.
३त्यामुळे काहीशी भीती मनात जाणवू लागली. मात्र काही मिनिटांच्या अवधीत वांद्रे टर्मिनस दृष्टिक्षेपात दिसल्याने काहीसा धीर आला. वांद्रे टर्मिनसजवळ आल्यावर ‘रात में टर्मिनल को क्या हैं?’ असे रिक्षाचालकाने विचारून तेथेच थांबविले. त्यानंतर रिक्षाचालक वांद्रे टर्मिनसवरून त्या प्रतिनिधीचा पाठलाग न करता आपल्या मार्गी निघून गेला. बीकेसीच्या मध्यवर्ती भागातून मध्यरात्री एकनंतर रिक्षा पकडणे ही बाब धोकादायक असल्याचे यात स्पष्ट झाले.
रूट : ३
पूजा दामले, (रिपोर्टर) कलानगर जंक्शन
रात्री ‘लोकमत’ प्रतिनिधी कलानगर जंक्शनच्या एका बसस्टॉपजवळ पोहोचली तेव्हा एका चहावाल्याकडे ५ ते ६ व्यक्ती चहा घेत उभ्या होत्या आणि २ व्यक्ती बसस्टॉपवर बसल्या होत्या. प्रतिनिधी तिथे थोडा वेळ घुटमळल्यावर त्यातले काही जण प्रतिनिधीकडे पाहू लागले. मग प्रतिनिधी थोडे पुढे जाऊन उभी राहिली. यानंतर तिथे उभे असलेले दोघे बाईकस्वार चक्क थोडे पुढे जाऊन बराच वेळ थांबलेले होेते. विशेष म्हणजे त्यांचे किमान चार साथीदार दोन बाईकवर आणखी पुढच्या थोड्या अंतरावर थांबलेले होते. महिला प्रतिनिधी काय करते आहे, याकडे ते सगळेच लक्ष ठेवून होते. या वेळी रस्त्यावर रहदारी नसल्याने रिक्षा थांबवण्यासाठी प्रयत्न करीत असतानाच ‘त्या’ दोन व्यक्तींकडे लक्ष ठेवणे भाग होते. ते आपसात काहीतरी बोलत होते. प्रतिनिधीने एलटीटीला जाण्यासाठी एका रिक्षावाल्याला हात दाखवला, पण त्याने येण्यास नकार दिला. अजून एक रिक्षावाला आला़ त्याने ‘मी सोडतो’ असे सांगितले. पण त्या रिक्षात एक महिला आणि एक पुरुष होतो. यामुळे प्रतिनिधीने नकार दिला. मागून एक रिक्षावाला आला आणि त्याने रिक्षा स्लो करीत ‘कहा जाना हंै’ असे विचारले. एलटीटी म्हटल्यावर बसायला सांगितले. रिक्षात बसल्या बसल्या त्या रिक्षावाल्याने प्रतिनिधीकडे रिक्षात पाठीमागे ठेवलेली पाण्याची बाटली मागितली. सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडवरून घ्या, असे सांगितल्यावर त्याने रिक्षा सुरू केली. यानंतर ‘मुंबई में नई हो क्या, एलटीटीसे कहा जाना हंै, अभी कहाँ से आयी हो,’ असे प्रश्न विचारायला सुरुवात केली. ‘एलटीटी के अंदर आराम से रह सकती हो,’ असे सांगत स्वत: विषयीही माहिती दिली. पण ‘मुंबई में अकेली लडकी को ट्रॅव्हल करने के लिए सेफ हैं क्या?’ असे विचारताच तो काहीही बोलला नाही. सतत बोलत असल्यामुळे रिक्षाचा वेग त्याने कमी केलेला होता. तो सतत माहिती काढण्याचाच प्रयत्न करीत होता. काही वेळा त्याचे मागे लक्ष होते. बीकेसीच्या म्हाडाकडील एंट्री पॉइन्टहून मध्यरात्री १ नंतर रिक्षा पकडणे ही धोकादायक बाब असल्याचे या प्रवासात समोर आले.
रुट ४ सायली कडू (रिपोर्टर) लोकमान्य टिळक टर्मिनस
१लोकमान्य टिळक टर्मिनसच्या बाहेरच्या रस्त्यावर येऊन ‘लोकमत’ प्रतिनिधी वडाळा भक्ती पार्क येथे जाण्यासाठी रिक्षा किंवा टॅक्सी मिळते का, हे शोधत होती. या परिसरात काही प्रमाणात रहदारी होती. पण रिक्षावाले प्रतिनिधीच्या बाजूने जाऊन वडाळा भक्ती पार्क सांगितल्यावर ‘वहाँ तक नहीं जा सकते, वडाळा आरटीओ को छोड देंगे’ असे सांगत पुढे निघून जात होते. प्रतिनिधी एलटीटी फ्लायओव्हरच्या दिशेने चालत गेल्यानंतर मागून आलेली एक रिक्षा ही प्रतिनिधीजवळ थांबली. कुठे जायचे आहे तुम्हाला, एकट्याच आहात का, असे प्रश्न प्रतिनिधीला रिक्षात बसलेल्या दोन व्यक्तींनी विचारले.
२ घाबरू नका मॅडम आम्ही पोलीस आहोत, असे सांगितले. ते दोघेही दारू प्यायले होते. विशेष म्हणजे दोन्ही व्यक्तींनी पोलिसांचा गणवेश घातलेला नव्हता. अखेर प्रतिनिधी रिक्षातून यायला तयार होत नसल्याचे लक्षात आल्यावर रिक्षा पुढे निघून गेली. दोन ते तीन मिनिटांत तिथे अजून एक रिक्षा आली. भक्ती पार्कला सोडतो, असे त्या रिक्षावाल्याने सांगितले. यानंतर प्रतिनिधी रिक्षात बसल्यावर फ्लायओव्हरवर रिक्षा गेल्यावर रिक्षावाल्याने रिक्षा थांबवली. तितक्यातच दुसरा रिक्षावाला त्या रिक्षाच्या बाजूला जाऊन थांबला.
३दोघांनी चर्चा केल्यावर मी भक्ती पार्कला सोडू शकत नाही. वडाळा आरटीओला सोडून तेथून टॅक्सी पकडून देतो, असे सांगितले. पण प्रतिनिधीने ती रिक्षा सोडली. पुढच्या ५ मिनिटांनी दुसरा रिक्षावाला आला. ‘बहुत टाइम से आप खड़े हैं, अकेले आपको ऐसे अकेला खड़े नहीं रख सकता बेटा। आप बैठ लो, आगे में टॅक्सी पकड़वा देता हूँ’ असे सांगितल्यावर प्रतिनिधी रिक्षात बसली. प्रवासात त्याचे वर्तन चांगले होते. आधीच्या अनुभवामुळे घाबरलेली प्रतिनिधी थोडी सावरली.
४रिक्षावाल्याने वेगात रिक्षा पळवली. रात्री २.४९ ला रिक्षा आरटीओ येथे पोहोचली. येथे मीटरप्रमाणे ८५ रुपये झाले होते. मात्र त्याने १०० रुपये घेतले. आणखी ५० रुपये द्या, असे सांगितले. मात्र नकार दिल्यावर ‘आपके लिए आया, थोडा और तो दो’ असे बोलायला लागला. विशेष म्हणजे जेथे त्याने सोडले तिथपासून भक्ती पार्क अवघ्या ५ मिनिटांच्या अंतरावर होता. मात्र त्यानंतरही दुसरी टॅक्सी करून देतो म्हणत शेवटपर्यंत तो थांबलेला होता. तो रिक्षावाला नक्की कशासाठी थांबला होता, हे मात्र गूढ होते. टॅक्सी कोणती करून देणार हे देखील संशयास्पद होते. हा रूट स्टिंगमधील सर्वाधिक धोकादायक रूट ठरला.
रूट ५ ,स्नेहा मोरे, (रिपोर्टर) मनीषा म्हात्रे, (रिपोर्टर) वडाळा आरटीओ
१वडाळा आरटीओ परिसरातून ‘लोकमत’च्या दोन प्रतिनिधी चालत होत्या. या वेळी पावणेतीन झाले होते. पुढची १० मिनिटे सामसूम असलेल्या रस्त्यावरून दोन्ही प्रतिनिधी टॅक्सी मिळते का, हे पाहण्यासाठी चालत होत्या. या वेळेत २ टॅक्सीचालकांनी प्रतिनिधींना पाहिले, मात्र टॅक्सी न थांबवताच पुढे निघून गेले. या वेळी त्यांच्या बाजूने २ ते ३ बाईकस्वार गेले. हे बाईकस्वार जाताना प्रतिनिधींकडे पाहून खाणाखुणा करीत होते, कुठे जाणार इतक्या रात्री, असे विचारत पुढे निघून गेले.
२त्यांच्या नजरेने प्रतिनिधींना अस्वस्थ वाटू लागले, भीतीही वाटली. त्याच दरम्यान मागून आलेल्या एका रिक्षाचालकाने पुढे जाऊन रिक्षा थांबवली. रिक्षा थांबल्यावर प्रतिनिधींनी चालण्याचा वेग वाढवला, पण तितक्यातच रिक्षातून दोघे जण खाली उतरले. हे पाहून प्रतिनिधी तिथेच थांबून आम्हाला यायचे नाही, असे खुणवले. तरीही ती रिक्षा पुढे जात नव्हती. इतक्यातच मागून एक टॅक्सीवाला आला. त्याला हात दाखवल्यावर तो थांबला.
३रिक्षावाल्याला टाळण्यासाठी प्रतिनिधींनी शिवडी फाटक सांगून पटकन टॅक्सीत बसल्या. थोडे पुढे जाताच टॅक्सीवाल्याच्या हालचाली संशयास्पद वाटू लागल्या. यानंतर टॅक्सीवाल्याकडे निरखून पाहिल्यावर त्याने कसली तरी नशा केल्याचे लक्षात आले. त्याचे डोळे लाल झाले होते. नशा केलेला हा चालक प्रतिनिधींकडे अश्लील नजरेने आरशातून न्याहाळत होता. मागून वाहन येत असल्याची चाहूल लागल्यावर तो वेग वाढवत होता. पण जिथे सामसूम होती अशा परिसरात तत्काळ वेग कमी करायचा. प्रतिनिधींचे लक्ष वेधून घेण्यासाठी तो विचित्र आवाज काढत होता. या प्रकारामुळे दोन्ही प्रतिनिधी फारच घाबरल्या.
४रस्त्यावर रहदारी नव्हती. मागून येणारे वाहन त्याच दिशेने येत असल्याचे समजल्यावर तो सावध झाला आणि शिवडी फाटकाजवळ आल्यावर त्याने टॅक्सी थांबवली. टॅक्सीतून उतरून प्रतिनिधी पैसे देताना वाईट नजरेने दोघींना बघत होता. हा प्रवास देखील दोघी प्रतिनिधींनी एकत्र करूनही अत्यंत धोकादायक, भीतीदायक वाटला.
रूट ६ - स्नेहा मोरे (रिपोर्टर) मनीषा म्हात्रे (रिपोर्टर)- शिवडी
मध्यरात्री शिवडी परिसरातून दोन्ही प्रतिनिधी भायखळा रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी खासगी वाहनाकडून (मारुती एको) लिफ्ट घेतली. या वेळी गाडीत जुनी ंिहंदी गाणीही सुरू होती़ गाडीत बसल्यावर तुम्हाला नक्की कुठे जायचे आहे, असे चालकाने विचारून गाडी चालविण्यास सुरुवात केली. प्रवास सुरू झाल्यावर ड्रायव्हिंग करीत असतानाच एका हाताने मोबाइलवरील मेसेजेसही चेक करीत होता. त्यानंतर काहीच न बोलता भायखळा रेल्वे स्थानकाच्या दिशेने प्रवास सुरू झाला. या मार्गावरील १०-१५ मिनिटांच्या प्रवासात खासगी वाहनात असूनही असुरक्षितेची भावना मनात आली नाही. काही वेळातच भायखळा रेल्वे स्थानकापाशी गाडी लावली. त्या चालकाचे आभार मानत किती रुपये झाले, अशी विचारणा प्रतिनिधींनी केली. त्यावर किती पैसे द्यायचे ते तुम्ही ठरवा, तुम्हाला योग्य वाटतील तसे, असे चालकाने उत्तर दिले. प्रतिनिधींनी १०० रुपये चालकाला दिले़ त्यावर एवढे पैसे नको, असे म्हणत चालकाने केवळ ५० रुपये घेतले. त्यानंतर त्या चालकाची विचारपूस करताना फारुख शेख डॉकयार्ड परिसरात राहतो, असे त्याने सांगितले. या प्रवासादरम्यान खासगी वाहनातून प्रवास करूनही चालकाने प्रतिनिधींच्या सुरक्षितेताबत घेतलेली दक्षता अधोरेखित करावी लागेल. मार्ग असुरक्षित असला तरी चालक जबाबदार असल्याचा अनुभव या प्रवासात आला.