‘शिवडी’ गडावर मनसेची कोंडी

By Admin | Updated: August 15, 2014 02:17 IST2014-08-15T02:17:24+5:302014-08-15T02:17:24+5:30

गेल्या पाच वर्षांत मात्र शिवडी मतदारसंघातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलली आहेत.

Macechi block on 'Shivadi' road | ‘शिवडी’ गडावर मनसेची कोंडी

‘शिवडी’ गडावर मनसेची कोंडी

 गौरीशंकर घाळे ल्ल मुंबई
गेल्या पाच वर्षांत मात्र शिवडी मतदारसंघातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलली आहेत. त्याची चुणूक विधानसभेनंतर दोनच वर्षांत झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत दिसली. लोकसभा निवडणुकीत शिवडीत मनसे उमेदवारांनी सपाटून मार खाल्ला. त्यामुळे शिवडी गडावर मनसेची मात्र कोंडी झाली आहे.
जेव्हा गिरणगावात केवळ शिवसेनेचा आवाज घुमायचा आणि शिवसेनाप्रमुखांचा शब्द अंतिम असायचा अशा काळात छगन भुजबळांनी बंड पुकारले. आपल्या सहकाऱ्यांसोबत काँग्रेसप्रवेश केला, सत्ताधारी बनले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत माझगाव मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या भुजबळांच्या विरोधात बाळा नांदगावकर नावाच्या नवख्या तरुण शिवसैनिकाला बाळासाहेबांनी उमेदवारी दिली आणि या तरुणाने भुजबळांना चारीमुंड्या चीत करत ‘जाएंट किलर’ अशी उपाधी मिळवली.
त्यानंतर १९९९, २००४ च्या निवडणुकीत बाळा नांदगावकर शिवसेनेच्या तिकिटावर आमदार झाले. राज ठाकरे यांनी शिवसेनेशी फारकत घेत मनसेची स्थापना केली. मनसेच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बाळा नांदगावकरांनी २००९ सालची विधानसभा मनसेच्या तिकिटावर लढविली. मतदारसंघ पुनर्रचनेत माझगाव विधानसभा शिवडीशी जोडली गेली. मनसेच्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत बाळा नांदगावकर यांनी चमत्कार घडविला. दगडू सकपाळांसारख्या मातब्बर उमेदवाराला पराभवाचा झटका नांदगावकर यांनी दिला. बाळा नांदगावकर यांनी ६ हजार ४६३ मतांनी शिवसेना उमेदवाराचा पराभव केला. नांदगावकरांना ६४ हजार ३५४ मते मिळाली, तर दगडू सकपाळ यांनी ५७ हजार ८९५ मते घेतली. काँग्रेस उमेदवार स्मिता चौधरी यांच्या वाट्याला अवघी १५ हजार ४३१ मते आली. पहिल्याच फटक्यात मनसेचे १३ उमेदवार विधानसभेत पोहोचले. बाळा नांदगावकर विधानसभेत मनसे गटनेता म्हणून काम पाहू लागले. त्यानंतर अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बाळा नांदगावकरांना पराभवाचा सामना करावा लागला. २००४ साली दुसऱ्या क्रमांकाची मते घेणाऱ्या नांदगावकरांना मात्र या निवडणुकीत डिपॉझिटही वाचविता आले नाही.
पाच वर्षे मनसे आमदार म्हणून मतदारसंघातील त्यांचा प्रभाव दिसला नाही. पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून नांदगावकरांच्या विरोधात केवळ नाराजीच नव्हे तर कडवट भावना झाल्याचे चित्र मतदारसंघात पाहायला मिळते. त्यामुळे खुद्द नांदगावकरांनी यंदाची निवडणूक न लढण्याचे संकेत दिले आहेत. बाळा नांदगावकर निवडणुकीपासून लांब राहिल्यास मनसेकडून राजू लांजवळ यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. राजकारणापासून लांब असणाऱ्या लांजवळ यांचा मतदारसंघातील सार्वजनिक मंडळे, विविध पथकांशी दांडगा जनसंपर्क आहे.
दुसरीकडे शिवसेनेने पुन्हा एकदा आपला बालेकिल्ला सर करण्यासाठी कंबर कसली आहे. प्रकृतीच्या कारणास्तव दगडू सकपाळ निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता नाही. विभागप्रमुख अजय चौधरी, नगरसेवक नाना आंबोले, श्रद्धा जाधव, सुधीर साळवी असे अनेक चेहरे शिवसेनेकडे आहेत. विभागातील जनसंपर्क आणि मातोश्रीवरील उठबस यामुळे चौधरी यांची उमेदवारी नक्की मानली जात आहे. इतकी वर्षे निवडणुकीच्या राजकारणापासून लांब राहिलेल्या चौधरींच्या उमेदवारीस विरोध होण्याची शक्यता नाही.
मतदारसंघात काँग्रेसची अवस्था असून नसल्यासारखी आहे. मागील निवडणुकीत १५ हजार मते घेणाऱ्या स्मिता चौधरी निवडणुकीनंतर फारशा दिसल्या नाहीत. राणे समर्थक राजेश हाटले यांचा लालबाग परिसरात चांगला संपर्क असला तरी तो निवडणुकीच्या दृष्टीने पुरेसा नाही. अन्य पक्ष उपचारापुरते असल्याने येथे शिवसेना आणि मनसे अशीच थेट लढत होण्याची चिन्हे आहेत. मात्र, बाळा नांदगावकर यांच्यासाठी शिवडीचा हा किल्ला अवघडच असल्याचे सध्याचे वातावरण आहे.

Web Title: Macechi block on 'Shivadi' road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.