वाकोल्यात इमारतीच्या गच्चीवरून पडून तरुणाचा मृत्यू
By Admin | Updated: March 8, 2017 02:10 IST2017-03-08T02:10:41+5:302017-03-08T02:10:41+5:30
राहत्या इमारतीच्या गच्चीवरून पडून अभिषेक दत्ताराम भोसले या २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. मंगळवारी संध्याकाळी वाकोला परिसरात ही दुर्घटना घडली.

वाकोल्यात इमारतीच्या गच्चीवरून पडून तरुणाचा मृत्यू
मुंबई : राहत्या इमारतीच्या गच्चीवरून पडून अभिषेक दत्ताराम भोसले या २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. मंगळवारी संध्याकाळी वाकोला परिसरात ही दुर्घटना घडली. मोबाईलवर बोलताना हा प्रकार घडलाय का? याची चौकशी सध्या सुरू असून पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
अभिषेक वाकोल्याच्या मंगलमूर्ती सोसायटीत राहत होता. त्याच्या घरी त्याचे आई वडील आणि मोठा भाऊ तसेच बहीण आहे. अभिषेक हा दादरच्या कोहिनूर इन्स्टिट्यूटमध्ये काही कोर्सेस करत होता. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून त्याची प्रकृती ठीक नव्हती. त्याला चक्करदेखील येत होती. मंगळवारीदेखील अस्वस्थ वाटत असल्याने टेरेसवरून फिरून येतो असे त्याने मोठ्या भावाला सांगितले आणि मोबाइल घेऊन वर गेला. काही वेळाने तो अचानक खाली कोसळला. तळ मजल्यावर राहणाऱ्या लोकांना काही तरी पडल्याचा आवाज आल्याने ते धावत बाहेर आले. तेव्हा त्यांना खाली पडलेला अभिषेक दिसला. याबाबत त्याच्या घरच्यांना कळविण्यात आले. लगेचच पोलीस नियंत्रण कक्षावर फोन गेल्याने पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी अभिषेक स्थानिक रुग्णालयात दाखल करविले. मात्र डॉक्टरने तपासून मृत घोषित केले. त्याच्या सोबत त्याचा मोबाइलही सापडला आहे. तो मोबाइलवर खेळत अथवा बोलत असताना त्याला चक्कर आली असावी, असा आमचा अंदाज असल्याचे वाकोला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव व्हावळे यांनी सांगितले. त्याच्या घरी लिहिलेले कोणतेही पत्र सापडलेले नाही. त्यामुळे ही आत्महत्या आहे का? हे देखील समोर आलेले नाही. सध्या अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घरच्यांनी देखील याप्रकरणी कोणाविरोधात तक्रार नसल्याचे पोलिसांना सांगितले आहे. (प्रतिनिधी)