लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भाऊ-बहीण यांच्यातील नाते पवित्र, उदात्त आणि अमूल्य असते. मात्र, आजच्या काळात हे नाते वाद, भावनिक तणाव आणि संघर्षाने ग्रासलेले दिसते. लालसा, अहंकार आणि भौतिक सुखांच्या हव्यासामुळे भावंडांच्या नात्यात दुरावा आला आहे. त्यांनी न्यायालयीन वादात अडकण्यापेक्षा त्याग करायला हवा, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने शनिवारी नोंदवले.
ज्येष्ठ नागरिकाने आपल्या बहिणीविरोधात केलेला मानहानीचा दावा निकाली काढताना उच्च न्यायालयाने कटुंबातील नातेसंबंधांवर भाष्य केले. दोन्ही भावंडांत प्रापर्टीवरून वाद आहे. बहिणीने भावाबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरल्याने भावाने तिच्याविरोधात कनिष्ठ न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला होता. बहिणीने आपले म्हणणे लेखी न मांडल्याने न्यायालयाने पुढील कारवाई सुरू केली. याविरोधात बहिणीने उच्च न्यायालयात धाव घेतली.
न्या. जितेंद्र जैन यांच्या एकलपीठापुढे या याचिकेवर सुनावणी झाली. दोन्ही भावंडे धार्मिक असून, त्यांनी एका भावंडाने दुसऱ्या भावंडासाठी वापरलेले अपशब्द पाहता त्यांचा धार्मिकपणा कुठेही दिसत नाही, अशी टिप्पणी न्यायालयाने केली.
रक्षाबंधन आणि भाऊबीज...आपल्या देशात साजऱ्या होणाऱ्या रक्षाबंधन आणि भाऊबीज या दोन सणांचे महत्त्व भाऊ-बहिणीतील शाश्वत नात्याचे प्रतीक आहे. हे सण भावंडांमधील प्रेम, आधार, विश्वास आणि संरक्षण याचे हृदयस्पर्शी उत्सव आहेत. हे सण साजरे करण्यामागील उद्देश असा की, सुख-दुःखाच्या प्रत्येक क्षणी, एकाला दुसऱ्याची गरज भासल्यास, दोघांनीही एकमेकांच्या पाठीशी उभे राहावे.दुर्दैवाने आजच्या काळात अनेक ठिकाणी भावंडे एकमेकांच्या बाजूने उभे राहण्याऐवजी न्यायालयात एकमेकांविरोधात उभी ठाकलेली दिसतात, अशी खंत न्यायालयाने व्यक्त केली.
नोटीस देण्यावरून गोंधळ आणि गैरसमज निर्माण झाला, असे निरीक्षण नोंदवित न्यायालयाने बहिणीचे लेखी उत्तर स्वीकारण्याचे निर्देश दिवाणी न्यायालयाला दिले. पक्षकारांचे वय लक्षात घेता त्यांनी आपापले वाद परस्पर संमतीने आणि सौहार्दपूर्णरीत्या सोडवणे हेच त्यांच्या हिताचे ठरेल. त्यातूनच त्यांच्या नात्यात शांतता आणि सौहार्द पुन्हा प्रस्थापित होईल. कारण, भाऊ-बहिणीचे नाते कधी घट्ट विणलेले असते, कधी थोडे सैल धरलेले असते; मात्र ते कधीही तुटत नाही, असे न्यायालय म्हणाले.
Web Summary : High Court notes greed strains sibling bonds. A senior citizen's defamation case against his sister highlights property disputes. The court urges reconciliation, emphasizing the enduring nature of the brother-sister relationship.
Web Summary : उच्च न्यायालय ने कहा कि लालच से भाई-बहनों के रिश्ते में तनाव आता है। एक वरिष्ठ नागरिक का अपनी बहन के खिलाफ मानहानि का मामला संपत्ति विवाद को उजागर करता है। अदालत ने सुलह का आग्रह किया, भाई-बहन के रिश्ते के महत्व पर जोर दिया।