Join us  

प्रवाशाचे सामान चोरीला; कोकण रेल्वेवर ठपका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 5:35 AM

गुन्हा नोंदविण्यास रेल्वेने चार ते पाच महिन्यांचा विलंब केला.

मुंबई : एक्सप्रेसमधून प्रवास करताना प्रवाशाचे सामान चोरीला गेले. मात्र, या घटनेची तक्रार नोंदविण्यास चार ते पाच महिन्यांचा विलंब लावल्याने, राज्य ग्राहक तक्रार निवारण मंचाने कोकण रेल्वे प्रशासनाला नुकसान भरपाई म्हणून प्रवाशाला १,१०,००० रुपये देण्याचा आदेश नुकताच दिला.

गुन्हा नोंदविण्यास रेल्वेने चार ते पाच महिन्यांचा विलंब केला. या काळात प्रवाशाला मानसिक त्रास झाला, त्याच्या मौल्यवान वस्तूही सापडल्या नाहीत, असे म्हणत राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाने प्रवाशाला मानसिक त्रासापोटी एक लाख व केस लढविण्याचा खर्च म्हणून १०,००० रुपये देण्याचा आदेश दिला. मात्र, प्रवाशाला हरविलेल्या वस्तूंपोटी मागितलेली सुमारे साडेचार लाखांची नुकसान भरपाई देण्यास नकार दिला.

वसईत राहणारे उन्नीकृष्णन नायर हे पत्नी व मुलासह २२ नोव्हेंबर, २०१२ रोजी त्रिवेंद्रुम नेत्रावती एक्स्प्रेसमधून प्रवास करत होते. दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांची एक्स्प्रेस कारवार येथे पोहोचली असता, नायर यांना पत्नीची हँडबॅग चोरीला गेल्याचे समजले. बॅगेत चार लाखांचे दागिने, दोन मोबाइल आदी ४,७२,०५० रुपयांचे सामान होते.

उन्नीकृष्णन यांच्या तक्रारीनुसार, हँडबॅग चोरीला गेल्यानंतर त्यांनी टीटीई, आरपीएफ जवानाला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते एक्स्प्रेसमध्ये नव्हते. त्यांनी एसी कोचमध्ये आराम करणा-या टीटीईला गाठले. त्याच्या म्हणण्यानुसार त्यांनी मडगावला गेल्यावर पोलिसांत तक्रार नोंदविली. ठाण्याला उतरल्यावर नायर यांनी कोकण रेल्वे मुख्यालयात तक्रार केली. त्यांनी ठाणे आरपीएफकडे तक्रार करण्यास सांगितले. ठाणे आरपीएएफने तक्रार कारवार अधीक्षकांकडे पाठविली. त्यांनी हे प्रकरण आपल्या हद्दीत येत नसल्याचे म्हणत तक्रार घेतली नाही.

अखेर ही तक्रार डीसीपी मुंबईकडून, डीआयजी बंगळुरू यांच्याकडे गेली. त्यांनी कारवार पोलिसांना तक्रार नोंदवण्यास सांगितले. चार ते पाच महिन्यांनंतर गुन्हा नोंदविण्यात आला. नायर यांनी ठाण्याच्या ग्राहक मंचात तक्रार केली. मंचाने कोकण रेल्वेला १,१०,००० रुपये देण्याचा आदेश दिला. मात्र वस्तूंची किंमत देण्यास नकार दिल्याने, नायर यांनी राज्य तक्रार निवारण आयोगाकडे धाव घेतली. कोकण रेल्वेनेही आयोगात अपील दाखल केले.

असे होते तक्रारदाराचे म्हणणेनायर यांनी आयोगाला सांगितले की, एक्स्प्रेसचे तिकीट बुक करून मी प्रवास केला. त्यामुळे माझे सामान सुरक्षित आणण्याची जबाबदारी रेल्वेची होती. प्रवाशांच्या व त्यांच्या सामानाच्या सुरक्षेसाठी डब्ब्यात पोलीस नव्हते.त्याशिवाय तक्रार नोंदविण्यास चार ते पाच महिन्यांचा विलंब लावण्यात आला. त्यामुळे हरविलेल्या मौल्यवान वस्तू आणि मानसिक त्रासापोटी कोकण रेल्वेला ४,७२,०५० रुपये देण्याचा आदेश द्यावा.कोकण रेल्वेने घेतला आक्षेप : तक्रारदाराच्या म्हणण्यावर कोकण रेल्वेने आक्षेप घेतला. ‘तक्रारदाराने त्यांचे सामान ‘लगेज’ म्हणून बुक केले नव्हते. त्यामुळे त्यांच्या सामानाची जबाबदार त्यांचीच होती. रेल्वेमध्ये टीटीई होता. त्याने प्रवाशाला तक्रार नोंदविण्यास सहकार्य केले. कोकण रेल्वेने कर्तव्यात कसूर केली नाही,’ असा युक्तिवाद कोकण रेल्वेने केला.

टॅग्स :रेल्वे