Join us

‘लव्ह सेक्स धोका’... लैंगिक शिक्षण ही काळाची गरज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 02:51 IST

समाजात आजही ‘लैंगिक शिक्षण’ ही संकल्पना पाश्चिमात्य देशाची संकल्पना मानली जाते. मात्र आपल्या प्राचीन ग्रंथ, पुराण आणि स्थापत्यशास्त्रात याविषयीचे दाखले असून त्यात जाहीरपणे याविषयी बोलले गेले आहे.

- डॉ. राजन भोसलेसमाजात आजही ‘लैंगिक शिक्षण’ ही संकल्पना पाश्चिमात्य देशाची संकल्पना मानली जाते. मात्र आपल्या प्राचीन ग्रंथ, पुराण आणि स्थापत्यशास्त्रात याविषयीचे दाखले असून त्यात जाहीरपणे याविषयी बोलले गेले आहे. सध्या कमी वयातच अधिक स्मार्ट होणाºया लहानग्यांना आणि त्यांच्यासह पालकांना लैंगिक शिक्षणाचे धडे देण्याची अत्यंत गरज आहे. याच दृष्टीकोनातून ‘लव्ह सेक्स धोका’ या सदरातून डॉ. राजन भोसले दर आठवड्याला संवाद साधणार आहेत.मुंबईतील उच्चभ्रू वसाहतीतील ११ वर्षांची मुलगी. अभ्यास आणि नृत्यात ती हुशार होती. वडील उद्योगपती तर आई प्राध्यापिका. लहानपणापासूनच आपल्या पाल्याविषयी अतिकाळजी करणारे हे पालक. त्यामुळे मुलींच्या शाळेत तिला प्रवेश करून दिला. रात्रंदिवस आई-वडिलांचे सुरक्षाकवच तिच्याभोवती असायचे. मात्र एक दिवस ११ वर्षांची ही मुलगी अचानक बोलेनाशी झाली, चिडचिड होऊ लागली. कायम बोलायला घाबरायला लागली. तिच्या पालकांनी मानसोपचारतज्ज्ञांकडे नेले असता, त्या मुलीवर त्यांच्याच इमारतीतील लिफ्टमनने जवळपास आठ महिने लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले. मात्र आई-वडिलांशी याविषयी कसे बोलायचे या विचाराने ती चिमुरडी मोडून पडली. लैंगिक शिक्षणाच्या अभावामुळेच ही घटना घडली. त्या चिमुरडीप्रमाणे अनेक उदाहरणे समाजात आजडी घडत आहेत. त्यामुळे आता तरी लैंगिक शिक्षणाचे महत्त्व ओळखून याविषयी जाहीर बोलले पाहिजे.लैंगिक शिक्षण ही आजच्या काळाची गरज आहे. मात्र आजही समाजात ‘लैंगिक शिक्षण’ म्हणजे संभोग हाच गैरसमज आहे. आपल्या संस्कृतीत आजही लैंगिकतेवर जाहीर बोलणे ही चूक मानली जाते. लैंगिक शिक्षणात संभोगप्रक्रियेचा भाग केवळ एक टक्का आहे. आजच्या घडीला घरातील कुटुंबातील व्यक्तीच लहानग्यांवर लैंगिक अत्याचार करीत आहे. त्याविषयी आपण त्यांना जागरूक केले पाहिजे, यासाठी हे शिक्षण लहानपणापासूनच दिले पाहिजे.मूल ४ ते ५ वर्षांचे झाले की, वयाच्या याच टप्प्यापासून अवयवांची ओळख करण्याच्या प्रक्रियेपासून या महत्त्वाच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करण्याची प्रक्रिया सुरू होते. कारण त्या वेळेला आपण कान, नाक, डोळे अशी ओळख देताना या लहानग्यांना जननेंद्रियाची ओळखच करून देत नाही. हासुद्धा शरीरातील महत्त्वाचा भाग आहे आणि तो निषिद्ध नाही हे पालकांनी लक्षात घेतले पाहिजे. ज्या वेळेस मूल शाळेच्या विश्वात प्रवेश घेत असते, तेव्हा त्या लहानग्याला आपल्या शरीरातील काही अवयव हे खासगी असून त्यांना कुणालाही स्पर्श करण्याचा, पाहण्याचा अधिकार नाही हे आवर्जून सांगितले पाहिजे. ज्या वेळेस मुलगा असो वा मुलगी वयात येत असते, त्या वेळेस शरीराप्रमाणे मानसिक बदलही वेळीच समजावून सांगण्याची अधिक गरज आहे. ते कसे पुढे समजून घेऊच.

 

टॅग्स :मुंबईगुन्हा